India Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष

Cricket : जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे तर काही खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.   

राजीव कासले | Updated: Jun 24, 2023, 08:54 PM IST
India Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष title=

India Tour of WI : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी ही निवड करण्यात आली आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. कसोटी आणि एकदिवीस संघाची धुरा रोहित शर्माकडेच (Rohit Sharma) असणार आहे. कसोटी (Test) आणि एकदिवसीय (ODI) संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) डावलण्यात आलं आहे. तर शिखर धवनलाही संधी देण्यात आलेली नाही. 

या खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्ष
आयपीएलच्या सोळाव्या (IPL 2023) हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडसाठीही भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. पण या खेळाडूंना संधी देत असताना स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) हाती पुन्हा एकदा निराशा लागली आहे. 23 वर्षांच्या सरफराज खानने स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.

रणजी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर
रणजी क्रिकेटच्या गेल्या हंगामात सरफराज खानने धावांचा डोंगर रचला होता. पण यानंतरही त्याची कसोटी संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकदिवसीय आणि टी20तल्या कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवडाला कसोटी संघात स्थान मिळतं. तर स्थानिक क्रिकेटमधल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर सरफराजला संघातून का डावललं जातंय? असा प्रश्न काही दिग्गज क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे. 

सरफराज खाने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3505 धावा केल्या आहेत. यात त्याने 13 शतकं आणि 9 अर्धशतकं ठोकली आहेत. सरफराजची सर्वोत्तम धावसंख्या 301 आहे. तर जवळपास 80 च्या स्ट्राईकरेटने त्याने धाव्या केल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन रणजी हंगामात त्याचा स्ट्राईक रेट 100 हून अधिक आहे. अशी कामगिरी असतानाही त्याची कसोटी संघात वर्णी न लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सरफराज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबई संघातून खेळतो. तो मधल्या फळीतील मुंबईचा हुकमी खेळाडू आहे आणि टीम इंडियासाठी देखली तो चांगला पर्याय ठरु शकतो. 

फिटनेस आडवं येतंय?
सरफराज खानला डावलण्यामागे सर्वात मोठं कारण मानलं जातं ते त्याचा फिटनेस आणि त्याचं जाडपण. पण या गोष्टींचा त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम जाणवत नाही. दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनीही सरफराजला डावलण्यावरुन बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत. बारीक मुलगा हवा असेल तर कोणत्यातरी मॉडेलची निवड करावी असं गावसकर यांनी म्हटलंय. 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी