T20 World Cup : माजी भारतीय क्रिकेटर उन्मुक्त चंद (Unmukt Chand) भारतासाठी 2010 आणि 2012 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप खेळला. 2012 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) जेतेपदही पटकावलं होतं. पण यानंतरही भारतीय क्रिकेट संघात उन्मुक्त चंदला संधी मिळाली नाही. यामुळे उन्मुक्त चंदने भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिकेत स्थायिक झाला. अमेरिका क्रिकेट संघाकडून (USA Cricket Team) त्याला खेळण्याचं निमंत्रण देण्यात आलं. पण आता त्याला अमेरिकेच्या क्रिकेट संघातही त्याला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे उन्मुक्त अमेरिकन क्रिकेट बोर्डावर चांगलाच संतापला आहे.
अमेरिकेन बोर्डाने दाखवला बाहेरचा रस्ता
अमेरिकन क्रिकेट बोर्डाने कॅनडाविरुद्धच्या पाच टी20 सामन्यांसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यात भारताचा माजी क्रिकेटपटू उन्मुक्त चंदला संधी देण्यात आली नाही. अमेरिकन क्रिकेट बोर्डाच्या या कृतीमुळे उन्मुक्त निराश झाला असून त्याने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्याने म्हटलंय 'जेव्हापासून मी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून माझं लक्ष्य होतं ते म्हणजे एकदिवस भारताविरुद्ध खेळण्याचं. ही बदला घेण्याची वृत्ती नाही तर व्यवसायिक भूमिका आहे, मी फक्त जगातील सर्वोत्तम संघाविरुद्ध स्वत:ला सिद्ध करु इ्च्छितो' असं उन्मुक्तने म्हटलंय.
पुढे उन्मुक्तने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'जीवनाचं हे सत्य आहे. मी नेहमीच लोकांना वाईट व्यवस्थेविरोधात तक्रार करताना पाहिलं आहे. ही व्यवस्था बदलवण्याच्या गोष्टी करताना ऐकलंय. पण आता वेळ आलीय स्वत:मध्ये बदल करण्याची. आता स्वत:मध्ये सकारात्म बदल करायाचा आणि सत्यासोबत उभं राहायचं' असंही उन्मुक्तने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन अमेरिका आणि वेस्टइंडिज संयुक्तरित्या करणार आहे. त्यामुळे उन्मुक्त चंद टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतातविरुद्ध खेळताना दिसेल असं बोललं जात होतं. पण त्याआधीच त्याला मोठा धक्का बसला आहे. कॅनडाविरुद्धच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी अमेरिकेच्या संघात न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज कोरी एंडरसनला संघात स्थान देण्यात आलं आहे. कोरी एंडरसन 2018 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला.
कॅनडाविरुद्धच्या पाट टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी अमेरिकन संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
मोनांक पटेल (कर्णधार), एरोन जोन्स (उप-कर्णधार), एंड्रीज़ गौस, कोरी एंडरसन, गजानंद सिंह, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शैडली वान शल्कविक, स्टीवन टेलर आणि उस्मान रफीक.