Jasprit Bumrah ICC Men's Player of the Month : टी20 वर्ल्ड कप जिंकत रोहित शर्माच्या नेतृत्वाखली टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होतंय. विशेषत: टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) अंतिम सामन्यात केलेल्या कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकलीत. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने जसप्रीत बुमराहला 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ' (ICC Men's Player of the Month) या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. या पुरस्कारासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, बांगलादेशचा स्टार खेळाडू रहमनुल्लाह गुरबाजही शर्यतीत होते. पण जसप्रीतने या दोघांनाही मागे टाकत पुरस्कार पटकावला.
पुरस्कारासाठी तीन खेळाडू शर्यतीत
'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी शर्यतीत असलेल्या तीनही खेळाडूंनी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आपली छाप उमटवली. रोहित शर्माने संघासाठी कर्णधार आणि सलामीवीर अशी दुहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडली. तर बांगलादेशचा स्टार फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. गुरबाजने 8 सामन्यात 3 अर्धशतकांच्या जोरावर 281 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने 8 सामन्यात 257 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. रोहितने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.
बुमराहची दमदार कामगिरी
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडिया अपराजित ठरली. टीम इंडियाच्या या कामगिरीत जसप्रीत बुमराहचं मोलाचं योगदान होतं. अनेक सामन्यात बुमराह संघासाठी संकटमोचक ठरला. 29 जूनला अंतिम सामन्यात बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या धावांना ब्रेक लावला. विराट कोहलीने कौतुक करताना जसप्रीत बुमराहला विजयाचं शिल्पकार म्हटलं होतं. टी20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द टूर्मामेंटचा मानकरी ठरला. बुमराहने 8 सामन्यात तब्बल 15 विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर जसप्रीत बुमराहने कुटुंबाचे, चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे आभार मानले. चांगल्या कामगिरीने संघाला विजय मिळवून देणं हे क्षण क्रिकेट कारकिर्दीत खास असतात असं बुमरहाने म्हटलंय.
स्मृती मंधानाचाही गौरव
जसप्रीत बुमराहबरोबरच महिला टीम इंडियाची आक्रमक फलंदाज स्मृती मंधानालाही आयसीसी वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरवण्यात आलं. जून महिन्यात स्मृती मंधानाने दोन शतकं आणि 90 धावांची शानदार खेळी केली.