मुंबई : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत. या मेडलची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली आणि भारताकडे एक-एक मेडल वाढत गेले. स्क्वॅशमध्ये देखील भारताने कांस्यपदक मिळवलं आहे. यावेळी सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल हे दोघेही नेतृत्व करत होते. या सामन्यात सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकलने ऑस्ट्रेलियन जोडीचा तुफानी पद्धतीने पराभव केला. दीपिका पल्लीकलने कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत पदक जिंकताच दिनेश कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, दीपिका पल्लीकल ही क्रिकेटर दिनेश कार्तिक याची बायको आहे.
स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या जोडीने कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या लोबन डोना आणि पीले कॅमेरॉन यांचा 2-0 असा पराभव केला.
त्यांनी ऑस्ट्रेलियन जोडीचा 11-8, 11-4 असा पराभव केला. दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी भारतासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. दोघांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये देखील रौप्य पदक जिंकले.
भारताचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिकने 2015 साली दीपिका पल्लीकलशी लग्न केले. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. आता पत्नी दीपिकाने पदक जिंकताच कार्तिकने ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले की, 'तुमची मेहनत आणि चिकाटी फळाला आली आहे. मी खूप आनंदी आहे आणि मला तुमच्या दोघांचा अभिमान आहे.
It's here!!
The effort and perseverance has paid off...so happy and proud of both of you!@DipikaPallikal @SauravGhosal #CWG22 pic.twitter.com/sHaJgXoGy1— DK (@DineshKarthik) August 7, 2022
कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट केले की, ''कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत स्क्वॅश मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांचे अभिनंदन. तुमचे पोडियम फिनिश हे भारतातील स्क्वॅशप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे. अशा विजयांमुळे आपल्या देशातील खेळांची लोकप्रियता वाढते''.
भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण 61 मेडल्स मिळाले आहेत. भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक 12 मेडल मिळाले. तर वेटलिफ्टिंगमध्ये 10, टेबल टेनिसमध्ये 7, बॉक्सिंगमध्ये 7, बॅडमिंटनमध्ये 6, ऍथलेटिक्समध्ये 8, लॉन बॉलमध्ये 2, पॅरा लिफ्टिंगमध्ये 1, ज्युडोमध्ये 3, हॉकीमध्ये 2, क्रिकेटमध्ये 1 आणि एक स्क्वॉशमध्ये 2 मेडल जिंकले.