बर्घिंगम : संपूर्ण जगावरून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाचा परिणाम हा खेळांवर खासकरून क्रिकेटवरही झालेला दिसला. कोरोना होऊ नये यासाठी क्रिकेटर्सची प्रचंड काळजी घेतली जाते. खेळाडू बाहेरच्या देशात खेळण्यासाठी गेले तरीही त्यांना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागतं. इतकंच सगळं असूनही एक धक्कादायक घटना कालच्या सामन्यात घडली.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये रविवारी रात्री अंतिम सामना गंला. पण या सामन्यात सर्वांना धक्का बसेल अशी घटना घडली. सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा झाली. सामना सुरु होण्यापूर्वी एका महिला खेळाडूचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. मात्र तरीही ही खेळण्यासाठी मैदानात उतरली होती.
तहिला मॅकग्रा या ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला रविवारी सकाळीच कोरोनाची हलकी लक्षणं दिसत होती. सामन्याआधी जेव्हा तिची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आढळली. अशावेळी संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये चिंतेचं वातावरण पसरलं.
She's in.
Cleared to play by Commonwealth Games Australia, Tahlia McGrath strides to the middle of Edgbaston #AUSvIND #B2022 https://t.co/MCGyNkp2z6
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2022
ज्यावेळी टॉस झाला तेव्हा तहिला मॅकग्राचा ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरात समावेश करण्यात आला होता. सामना सुरु झाल्यानंतर ती ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नव्हे तर दुसरीकडे बसलेली दिसली. तिने चेहऱ्यावर मास्कही लावला होता. इतकंच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट्स गेल्यानंतर ती मैदानातही आली. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर अवघ्या दोन रन्सवर ती बाद झाली.
दरम्यान यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू मैदानात कशी काय खेळू शकते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पण सामना सुरु होण्यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियानं सामनाधिकारी आणि इतर तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. आणि त्यानंतरच मॅकग्राला खेळण्याची परवानगी मिळाली.
यावेळी आयसीसीनेही मॅकग्राला खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे मॅकग्रा या सामन्यात खेळू शकली. पण खेळतानाही कोरोनासंबंधीचे काही प्रोटोकॉल्स पाळणं तिच्यासाठी बंधनकारक होतं.