भारतीय खेळाडूंच्या खेळ भावनेवर इंग्लंडची टीका

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Updated: Jul 6, 2018, 09:33 PM IST
भारतीय खेळाडूंच्या खेळ भावनेवर इंग्लंडची टीका  title=

कार्डिफ : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला. कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि त्यानंतर लोकेश राहुलनं केलेल्या शतकामुळे भारतानं इंग्लंडनं ठेवलेलं आव्हान अगदी सहज पार केलं. पण या मॅचमध्ये भारतीय बॉलरच्या खेळ भावनेवरच इंग्लंडच्या डेव्हिड विलीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय बॉलरनी बॉलिंग करताना शेवटच्या क्षणी माघार घेतली. याचवरून विलीनं भारतीय खेळाडूंवर टीका केली. जॉस बटलरला बॉलिंग करताना कुलदीप यादवनं माघार घेतली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा डेव्हिड विली आणि भुवनेश्वर कुमारमध्ये बाचाबाची झाली. भुवनेश्वर कुमारनंही अशाच प्रकारे बॉलिंग टाकताना शेवटच्या क्षणी माघार घेतली.

मी काय करणार आहे हे भुवनेश्वर कुमारला पाहायचं होतं. भारतीय बॉलरनी पहिल्या मॅचमध्ये असं अनेकवेळा केलं. पण नियम काय सांगतात ते मला माहित नाही. पण मला हे आवडलं नाही. या गोष्टी खेळ भावनेला धरून नाहीत, असं डेव्हिड विली म्हणाला.

पहिल्या टी-२०मध्ये भारतीय बॉलरपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. कुलदीप यादवनं ४ ओव्हरमध्ये २४ रन देऊन ५ विकेट घेतल्या. कुलदीपच्या बॉलिंगमुळे इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १६० रनच बनवता आले. यानंतर लोकेश राहुलनं ५४ बॉलमध्ये १०१ रनची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. ३ मॅचच्या सीरिजमध्ये आता भारत १-०नं आघाडीवर आहे.