बलिदान मानचिन्ह हटवण्यास धोनीचा नकार, आयसीसीच्या भूमिकेकडे लक्ष

बीसीसीआय आणि आयसीसी आमने-सामने

Updated: Jun 7, 2019, 03:02 PM IST
बलिदान मानचिन्ह हटवण्यास धोनीचा नकार, आयसीसीच्या भूमिकेकडे लक्ष title=

मुंबई : धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान मानचिन्हा'वरुन सध्या वाद सुरु आहे. बुधवारी साउथेम्प्टनमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीने बलिदान चिन्ह असेलेले ग्लोज घालून विकेटकीपिंग केले. त्यानंतर आयसीसीने धोनीला हे चिन्ह काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. पण धोनीने आपल्या ग्लोजवरुन हे मानचिन्ह हटवण्यास नकार दिला असल्याचं कळतं आहे.

आयसीसीच्या सुचनेनंतर बीसीसीआय देखील धोनीच्या बाजुने उभी राहिली नाही. सोशल मीडियावरुन देखील धोनीला मोठा पाठिंबा मिळत आहे. नेटकऱ्यांनी आयसीसीला यावेळी चांगलंच फैलावर घेतल्याचं दिसतं आहे. ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. 

बीसीसीआयचे COA चीफ विनोद राय यांनी म्हटलं की, 'आम्ही आयसीसीला एमएस धोनीच्या ग्लोजवर असेलेल्या बलिदान मानचिन्ह ठेवण्यासाठी आधीच परवानगी मागणारं पत्र लिहिलं आहे.'

बीसीसीआय नंतर आता क्रीडा मंत्रालय देखील धोनीच्या समर्थनात उतरली आहे. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं की, 'खेळाच्या नियमांमध्ये सरकार हस्तक्षेप नाही करु शकत. ती स्वतंत्र संस्था आहे. पण जेव्हा मुद्दा हा देशाच्या भावनेशी संबंधित असतो. त्यावेळी राष्ट्रहिताचा विचार केला जातो. मी बीसीसीआयला आयसीसीमध्ये हा मुद्दा लावून धरण्यासाठी विनंती करतो.'

आयसीसीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, 'जर एम.एस धोनी आणि बीसीसीआयने आयसीसीला हा विश्वास दिला की, हे चिन्ह राजकीय, धार्मिक किंवा टीका करणारं नाही आहे. तर आयसीसी यावर विचार करु शकते.'