कोलंबो : भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या टी-20 मॅचआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दिनेश चंडीमल दोन मॅचसाठी निलंबित झाला आहे. वेळेमध्ये ओव्हर पूर्ण न केल्यामुळे चंडीमलवर ही कारवाई करण्यात आली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये श्रीलंकेनं निर्धारित वेळेमध्ये चार ओव्हर कमी केले. या कारणामुळे चंडीमलचं निलंबन करण्यात आलं आहे.
वेळेमध्ये ओव्हर पूर्ण न केल्यामुळे चंडीमलचे दोन अंक कापण्यात आले. दोन अंक कापल्यावर खेळाडूचं दोन वनडे किंवा दोन टी-20साठी निलंबन करण्यात येतं. चंडीमलबरोबरच श्रीलंकेच्या प्रत्येक खेळाडूच्या मॅच फीमधून ६० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे. पुढच्या दोन मॅचसाठी थिसारा परेरा श्रीलंकेचा कॅप्टन असेल. या ट्राय सीरिजमध्ये श्रीलंका फायनलमध्ये गेली तर त्या मॅचमध्ये चंडीमल खेळू शकेल.
निर्धारित वेळेमध्ये ओव्हर पूर्ण न केल्यामुळे बांग्लादेशचा कॅप्टन महमदुल्लाहवरही कारवाई करण्यात आली आहे. निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी केल्यामुळे महमदुल्लाच्या मॅच फीमधून २० टक्के रक्कम तर बांग्लादेशच्या इतर खेळाडूंच्या मॅच फीमधून १० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.