आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना! पाहा कधी, कुठे पाहता येणार हा Asia Cup चा सामना

Asia Cup India Vs Pakistan: या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असून आपले पहिले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. भारताचे दोन्ही विजय हे एकतर्फी आहेत. दुसरीकडे पाकिस्ताननेही आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2023, 01:12 PM IST
आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना! पाहा कधी, कुठे पाहता येणार हा Asia Cup चा सामना title=
श्रीलंकेमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे

Asia Cup India Vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने येतो तेव्हा ती क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. पुढील 6 महिन्यांमध्ये हे दोन्ही संघ अनेकदा आमने-सामने येणार आहेत. याचदरम्यान भारत अ आणि पाकिस्तान अ संघाचा सामनाही खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांदरम्यान इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा सामना आज म्हणजेच 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. भारत अ आणि पाकिस्तान अ दरम्यान होणाऱ्या या सामन्याबद्दलही चाहत्यांना फारच उत्सुकता आहे. या सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोडवर केलं जात आहे. मात्र हा सामना टीव्हीवरही लाइव्ह पाहता येणार आहे.

कुठे पाहता येणार हा सामना?

इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्ता अ दरम्यानचा हा सामना फॅनकोड अॅपवर लाइव्ह प्रक्षेपित होणार आहे. मात्र यासाठी फॅनकोडचं सबस्क्रीप्शन असणं आवश्यक आहे. मात्र हे सबस्क्रीप्शन नसेल घ्यायचं तर क्रिकेट चाहत्यांसाठी आणखीन एक पर्याय आहे तो म्हणजे टीव्हीचा. हा सामना टीव्हीवरही दाखवला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर हा सामना लाइव्ह पाहता येईल. यासाठीही चॅनेल सबस्क्राइब करावं लागणार आहे. मात्र भारतीय संघाचे अनेक सामने या चॅनेलवर होत असल्याने अनेकांकडे आधीपासूनच या चॅनेलचा अॅक्सेस आहे. 

इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचे सामने भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये स्टार स्पोर्ट्स 1 आणि 3 वर पाहता येणार आहे. याशिवाय हा सामना एसीसीच्या युट्यूब चॅनेलवरही हा सामना लाइव्ह दाखवला जाणार आहे. मात्र हा सामना भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळच्या क्रिकेट चाहत्यांना युट्यूबवरुन लाइव्ह पाहता येणार नाही. 

भारताची दमदार कामगिरी

इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत अ संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ एकूण 2 सामने खेळला असून दोन्ही सामन्यांमध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताने पहिल्या सामन्यात युएई ए संघाला 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात नेपाळच्या संघाला 9 विकेट्स राखून पराभूत केलं. पाकिस्तानबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी नेपाळच्या संघाला 4 विकेट्सने पराभूत केलं. युएई अ विरुद्धचा सामना पाकिस्तानने 184 धावांनी जिंकला. आता दोन्ही संघ आपला तिसरा सामना एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे.