लंडन: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघावर बुधवारी आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नामुष्कीची वेळ ओढावली. या सामन्याच्या पहिल्या डावात आयर्लंडने इंग्लंडचा अवघ्या ८५ धावांमध्ये खुर्दा उडवला. लॉर्डसच्या मैदानात काही दिवसांपूर्वीच इंग्लंडने विश्वचषक उंचावला होता. यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये आयर्लंडने इंग्लंडचा हा रुबाब उतरवला.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या चांगलाच अंगलट आला. आयर्लंडच्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज टिम मुर्तागने १३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी टिपत इंग्लंडच्या आघाडीचे कंबरडे मोडले. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनीही केवळ मैदानावर हजेरी लावण्याची औपचारिकता पार पाडली.
त्यामुळे इंग्लंडची अवस्था ७ बाद ५० अशी झाली होती. मात्र, सॅम करन (१८) आणि ओली स्टोन (१९) यांनी थोडावेळ कशीबशी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंग्लंडला निदान ८५ धावांपर्यंत मजल मारता आली.
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडने सर्वोत्कृष्ट खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली होती. मात्र, आता नवख्या आयर्लंडने इंग्लंडसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. हा आयर्लंडचा केवळ तिसरा कसोटी सामना आहे. यापूर्वी त्यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आजच्या कामगिरीने आयर्लंडने सर्वांनाच चकित केले आहे. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.