'मला दोन मुलं झाली, पण तू अजून...,' इंग्लंडच्या खेळाडूकडून विराट कोहलीचं स्लेजिंग, म्हणाला 'उगाच मूर्खपणा...'

इंग्लंडचा कसोटी क्रिकेटर अ‍ॅलेक्स याने 2022 मध्ये कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीचं स्लेजिंग केल्याचा खुलासा केला आहे. माझं ते बोलणं विराटला बरेच दिवस सतावत होतं असाही दावा त्याने केला.   

शिवराज यादव | Updated: Oct 25, 2023, 04:48 PM IST
'मला दोन मुलं झाली, पण तू अजून...,' इंग्लंडच्या खेळाडूकडून विराट कोहलीचं स्लेजिंग, म्हणाला 'उगाच मूर्खपणा...' title=

इंग्लंडचा कसोटी क्रिकेटर अ‍ॅलेक्स याने 2022 मध्ये कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीचं स्लेजिंग केल्याचा खुलासा केला आहे. एजबॅस्टन येथे हा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यादरम्यान अॅलेक्स याने विराट कोहलीला शतकावरुन डिवचताना मला दोन मुलं झाली पण अद्याप तू शतक केलेलं नाहीस असं म्हटलं होतं. विराट कोहली त्यावेळी करिअमधील कठीण काळाचा सामना करत होता. त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नव्हत्या. शतकांचा बादशाह असणाऱ्या विराट कोहलीने त्यावेळी नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावलं नव्हतं. 

या कसोटी सामन्यात विराट कोहली वारंवार इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्ट्रॉला फलंदाजी करताना स्लेज करत होता. जॉनीने या सामन्यातील पहिल्या डावात दबावात असतानाही शतक ठोकलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या शतकासाठी विराटलाच जबाबदार धरलं होतं. आपल्या पुस्तकात त्याने सांगितलं आहे की, कोहली बराच वेळ स्लेजिंग करत होता आणि आपण शांत राहावं अशी माझी इच्छा नव्हती. 

"जेव्हा मी फलंदाजी करत होतो तेव्हा तो फार स्लेजिंग करत होता. क्रिकेटमध्ये कोणाची काय स्थिती आहे याचा मला फरक पडत नाही. मैदानात तुम्ही सगळे समान असता. कोणीतरी मला चिडवत असताना मी ते शांतपणे बसणार नव्हतो. तो एक जबरदस्त खेळाडू आहे, पण त्यावेळी तो फक्त मूर्खपणा करत होता," असं अ‍ॅलेक्सने म्हटलं आहे. यानंतर अ‍ॅलेक्सने विराटकडे पाहिलं आणि म्हणाला की, "तू शेवटचं शतक झळकावलं आहेस तेव्हापासून मला दोन मुलं झाली आहेत".

भारताच्या माजी कर्णधारासाठी हा सामना फार काही चांगला नव्हता. या सामन्यात विराट कोहली फक्त 11 आणि 20 धावा करु शकला. इंग्लंडने 378 धावांचा पाठलाग करत या सामन्यात भारताचा पराभव केला. 

विराट कोहलीवर प्रचंड दबाव असतो हे मान्य करताना अ‍ॅलेक्सने तुम्ही इतकं आक्रमक न होताही स्पर्धा करु शकता असं म्हटलं. "शेवटी, तोदेखील एक माणूस आहे. ही गोष्ट बराच वेळ त्याच्या डोक्यात होती आणि कदाचित त्यामुळेच तो शांत राहिला. मी एकदा त्याच्याशी बोललो असता तो रागात दिसत होता. खासकरुन जेव्हा आम्ही सामन्यानंतर चहा पिण्यासाठी आलो होतो तेव्हा. तो एक स्पर्धात्मक खेळाडू आहे. त्याला नेहमी जिंकायचं असतं. आपल्या खांद्यावर करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझं असतं ही गोष्ट मी समजू शकणार नाही. तुम्ही संयम पाळतही स्पर्धात्मक होऊ शकतो," असं अ‍ॅलेक्सने सांगितलं.