T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.   

शिवराज यादव | Updated: May 31, 2024, 07:44 PM IST
T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला... title=

T20 World Cup India vs Pak: क्रिकेटरसिकांना प्रतिक्षा असलेला टी-20 वर्ल्डकप रविवारपासून सुरु होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. दरम्यान 5 जूनला आयर्लंडविरोधात भारत आपला पहिला सामना खेळणार आहे. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारत आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. 9 जूनला सर्व क्रिकेटजगताला प्रतिक्षा असणारा हा सामना होणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून संबंध ताणले असल्याने भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसह फार खेळलेले नाहीत. भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास नेहमीच नकार दिला आहे. दुसरीकडे वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2021 मधील टी-20 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने भारताची हा यशस्वी मालिका खंडीत केली होती. 2022 मध्ये भारताने याचं उत्तर देताना मेलबर्नमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. 

भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार असल्याने आतापासून अनेक माजी खेळाडू आपलं मत मांडत असून, भविष्यवाणी करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी विकेटकिपर कामरान अकमल यानेही भविष्यवाणी वर्तवली असून, भारतच विजयी होईल असं म्हटलं आहे. इंस्टाग्रामला एका चाहत्याने कामरान अकमलला सामना कोण जिंकेल असं विचारलं असता त्याने 'नक्कीच भारत' असं उत्तर दिलं. 

कामरान अकमलने यावेळी इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनच्या मताशी सहमती दर्शवली आहे. मायकल वॉनने इंग्लंडच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधातील T20 मालिका खेळण्यासाठी आयपीएल स्पर्धेतून बाहेर काढण्याऐवजी शेवटच्या टप्प्यात खेळण्याची परवानगी दिली असती तर अधिक फायदा झाला असता असं म्हटलं होतं. "गेल्या काही दिवसांपासून, मला आश्चर्य वाटत होतं की इंग्लंडचा माजी कर्णधार पाकिस्तान क्रिकेटला फार गांभीर्याने घेत नाही आहे. हे फार वेदनादायक आहे, परंतु मला वाटते की त्याचं मूल्यांकन योग्य आहे," असं अकमलने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.

"पाकिस्तान क्रिकेटची पातळी सगळ्यांना माहीत आहे. आम्ही आयर्लंडसारख्या छोट्या संघांविरुद्ध हरलो आहोत. त्या अर्थाने वॉनने ही फार संघर्षमय मालिका नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दोष आमचाच आहे. जर समोर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतासारखा इतर कोणताही संघ असता तर त्याने असं म्हटलं नसतं. आम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की आयपीएलमध्ये, सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज 40 ते 50,000 च्या गर्दीसह भाग घेतात. त्यामुळे हे कठीण आणि दर्जेदार क्रिकेट आहे," असंही त्याने सांगितलं.