Virat Kohli Fan Marriage: भारतीय क्रिकेट चाहते मागील अनेक महिन्यांपासून विराट कोहलीच्या 71 व्या अंतरराष्ट्रीय शतकाची वाट पाहत होते. विराटच्या अनेक चाहत्यांनी तर देव पाण्यात ठेवण्याबरोबरच जोपर्यंत विराटचं 71 वं शतक होत नाही तोपर्यंत अमुक करणार नाही तमुक करणार नाही असा प्रणही केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विराटच्याच अशाच एका चाहत्याने त्याचं 71 वं शतक होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. या चाहत्याला विराटचं शतक पाहण्यासाठी दोन वर्ष वाट पहावी लागली. आशिया चषक स्पर्धेमध्ये विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावत 71 व्या शतकाला गवसणी घातली.
या शतकानंतर विराट तुफान फॉर्ममध्ये असून त्याने शतकांचा धडाकाच सुरु केला आहे. 71 व्या शतकापर्यंत पोहोचल्यानंतर विराटने रविवारी श्रीलंकेविरुद्ध 110 चेंडूंमध्ये नाबाद 166 धावा करत 74 वं शतक झळकावलं. 71 व्या शतकानंतर विराटने मागे वळून पाहिलं नाही असं म्हणता येईल अशी कामगिरी तो मागील काही महिन्यांपासून करतोय. त्याला सूर गवसल्याने एका चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असून विराटने जेव्हा 74 वं शतक (Virat Kohli 74 Century) झळकावलं त्याच दिवशी या चाहत्याने आपला पण पूर्ण करत लग्न केलं.
एका सामन्यामध्ये, "जोपर्यंत विराट 71 वं शतक झळकावत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही," असं पोस्टर घेऊन बसलेल्या या चाहत्याचं नाव आहे अमन अग्रवाल. अमनने आता विराटच्या 74 व्या शतकानंतर एक फोटो शेअर केला आहे. यापैकी एका फोटोमध्ये तो ज्या पोस्टरमुळे लोकप्रिय झाला ते पोस्टर पकडून मैदानात बसल्याचा फोटो आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तो शेरवानी परिधान करुन टीव्ही स्क्रीनसमोर उभा असल्याचं दिसत आहे. टीव्हीवर विराट त्याचं 74 वं शतक साजरं करताना दिसत आहे.
"मी 71 व्या शतकाची मागणी केली होती. त्याने माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी 74 वं शतकं साजरं केलं," अशा कॅप्शनसहीत अमनने हा फोटो शेअर केला आहे.
"I asked for the 71st century but he scored 74th on my special day" @imVkohli @AnushkaSharma @StayWrogn pic.twitter.com/zHopZmzKdH
— Aman Agarwal (@Aman2010Aman) January 16, 2023
अमनचा हा फोटो व्हायरल झाला असून अनेकांनी त्याचं लग्न झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून केवळ चार शतकं दूर आहे. सचिनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं आहेत. तर कोहलीने रविवारी एकदिवसीय सामन्यांमधील आपलं 46 वं शतक साजरं केलं.