Fastest Fifty With Help Of 11 Boundaries And Sixes: झिम्बाब्वेमध्ये सध्या एफ्रो टी-10 लीग सुरु आहे. हरारे येथे हे सामने खेळवले जात आहे. या लीगमधील 12 वा सामना बुलावायो ब्रेव्स आणि हररे हरिकेन्सदरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये बुलावायो यांनी दमदार विजय मिळवला. झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघातील अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने वादळी खेळी केली. या सामन्यामध्ये त्याने 21 चेंडूंमध्ये 70 धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर बुलावायो ब्रेव्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचं निर्णय घेणं फायद्याचं ठरलं.
फलंदाजी करताना हरारे हरिकेन्सच्या संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बुलावायो ब्रेव्सच्या संघाने 5 चेंडू शिल्लक असतानाच 9.1 षटकांमध्ये लक्ष्य गाठलं. धावांचा पाठलाग करताना सिकंदर रझाने भन्नाट फलंदाजी केली. त्याने केवळ 21 चेंडूंमध्ये 70 धावा कुटल्या. त्याने केवळ 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. हे या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे.
आपल्या 70 धावांच्या खेळीमध्ये रझाने 6 षटकार आणि 5 चौकार मारले. म्हणजेच 70 धावांपैकी 56 धावा केवळ चौकार-षटकारांच्या माध्यमातून केले. उरलेल्या 14 चेंडूंमध्ये त्याने एकेरी आणि दुहेरी धावा काढल्या. रझाबरोबरच या सामन्यामध्ये कोब हार्फ्टनेही 23 चेंडूंमध्ये 41 धावांची खेळी केली. त्याने 3 षटकार आणि 3 चौकार लगावले.
हरारे हरिकेन्सकडून फलंदाजीमध्ये भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने 15 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या. त्याशिवाय एविन लुइसने 19 चेंडूंमध्ये 49 धावांची खेळी केली. यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. एविनने चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याच्या संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. त्याशिवाय फलंदाजीची संधी मिळालेल्या मोहम्मद नबीला भोपळाही फोडता आला नाही. इयन मॉर्गनने 7 तर इरफान पठाणने 9 चेंडूंमध्ये 18 धावा केल्या.
सिकंदर रझा हा टी-10 लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीने 160 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 200 हून अधिक आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये सिकंदर रझाने आपल्या कामगिरीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.