Alyssa Healy: भारतात सध्या वुमेंस प्रिमीयर लीग खेळवण्यात येतेय. बुधवारी या लीगमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध युपी वॉरियर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. बंगळूरूच्या चिन्नस्वामीच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात आला असून या सामन्यात मुंबईच्या टीमला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान या सामन्यात अशी एक घटना घडली आहे, ज्यामध्ये युपीची कर्णधार एलिसा हिलीने खूप हिम्मत दाखवल्याचं बोललं जातंय.
या सामन्यात यूपी वॉरियर्सने 21 बॉल्स बाकी असताना मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) मध्ये त्यांचा विजय रथ रोखला. या सामन्यादरम्यान एक व्यक्ती कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत मैदानात घुसली. यावेळी एलिसा हिलीने त्याला माघारी घाडलं.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरु असताना ही घटना घडली. यावेळी यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिली मैदानात घुसलेल्या व्यक्तीशी भिडली. मुंबई इंडियन्सच्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हा व्यक्ती मैदानात घुसला. या व्यक्तीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला चकमा देऊन मैदानात प्रवेश केला आणि खेळपट्टीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी ॲलिसा हिलीने त्या व्यक्तीला पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या व्यक्तीला पकडून बाहेर काढले. या व्यक्तीच्या हातात आरसीबीची जर्सी असल्याचंही दिसून आलं.
Alyssa Healy tackling the pitch invader tonight at the Chinnaswamy Stadium. pic.twitter.com/h3T9PgVadV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 28, 2024
बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. सोलापूरच्या किरण नवगिरेने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर युपी वॉरियर्सने या सिझनमधील पहिला विजय नोंदवला. तिने 31 बॉल्समध्ये 57 रन्सची खेळी केली. यामध्ये 6 फोर आणि 4 सिक्सेसचा समावेश होता. पहिले दोन सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमला हेली मॅथ्यूजच्या अर्धशतकानंतरही प्रथम फलंदाजी करताना 161 रन्स करता आले. यूपी वॉरियर्सने 16.3 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावत 163 रन्स करत विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सचा हा तिसरा सामना होता. यावेळी पहिले दोन सामने जिंकणाऱ्या मुंबईला या सिझनमध्ये पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईने यापूर्वी दिल्ली आणि गुजरात जायंट्सचा पराभव केला होता. स्पर्धेच्या इतिहासातील यूपी आणि मुंबईमधील हा चौथा सामना होता. गेल्या वर्षीच्या सिझनच्या मुंबई आणि यूपीने प्रत्येकी एक सामना जिंकला होता.