इमरान खानला निवडणूक जिंकवण्यासाठी क्रिकेटपटू मैदानात

पाकिस्तानमध्ये २५ जुलैला निवडणुका होणार आहेत.

Updated: Jul 23, 2018, 04:45 PM IST
इमरान खानला निवडणूक जिंकवण्यासाठी क्रिकेटपटू मैदानात  title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २५ जुलैला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या मैदानामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमरान खान उतरला आहे. इमरान खानला निवडणूक जिंकवण्यासाठी आता माजी क्रिकेटपटूही पाठिंबा देताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी इमरान खानला पाठिंबा दिला आहे. मी राजकारणी नाही, पण मला इमरान खान यांचं नेतृत्व आवडतं. तुम्ही एक महान नेते आहात आणि तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही नक्कीच पाकिस्तानसाठी चांगलं काम कराल, असं ट्विट डीन जोन्सनं केलं आहे.

वसीम अक्रमचाही पाठिंबा

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यानंही इमरान खानला पाठिंबा दिला आहे. तुमच्याच नेतृत्वामुळे आम्ही १९९२ चा वर्ल्ड कप जिंकलो. आता तुमच्याच नेतृत्वात आता आपण पुन्हा एक महान लोकतांत्रिक देश बनू शकतो. कर्णधारासाठी मतदान, नवीन पाकिस्तान, असं ट्विट वसीम अक्रमनं केलंय. वकार युनूसनंही इमरान खानच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे.

१०० दिवसांची योजना

जर पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) सत्तेत आली तर देशातल्या गंभीर आर्थिक आणि प्रशासनिक चिंता मिटवण्यासाठी १०० दिवसांच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असं इमरान खाननं सांगितलं. जास्तीत जास्त रोजगार निर्मीती करणं, गरिबांसाठी घरं बनवणं, वीजेचा तुटवडा कमी करणं, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधार करणं आणि भ्रष्टाचाऱ्याविरोधात कडक कारवाई करणं, अशी आश्वासनं इमरान खाननं दिली आहेत.

लष्कराचाही पाठिंबा

पाकिस्तानचं लष्करही इमरान खानला गुप्तपणे मदत करून त्याच्या विरोधकांना निशाणा बनवत असल्याचा आरोप होत आहे. पण इमरान खान यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मागच्या आठवड्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जेलमध्ये जावं लागलं. यानंतर इमरान खानची पंतप्रधान बनण्याच्यी शक्यता वाढली आहे.