भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

गौतम गंभीरला नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

Updated: Mar 22, 2019, 12:28 PM IST
भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश title=

Loksabha Election 2019, नवी दिल्ली : भारतीय टीमचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर लवकरच तो राजकारणात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. या शक्यतेवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. गौतम गंभीरने आज राजकारणात प्रवेश केला आहे. गंभीर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपसाठी ही आनंदाची बातमी आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर असलेला गौतम गंभीर आता राजकारणाच्या मैदानात बॅटींग करताना दिसणार आहे. भाजप गौतम गंभीरला दिल्लीमधून लोकसभेची उमेदवारी देऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून तो राजकारणात येणार अशी चर्चा होती. क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षाचे माजी खासदार आणि सध्याचे आमदार यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपकडून सुरु आहे. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला देखील भाजपकडून हरियाणाच्या रोहतकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपचे एक वरिष्ठ नेते गौतम गंभीरच्या संपर्कात होते. नवी दिल्लीमधून गौतमला मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी गौतम गंभीरला उमेदवारी मिळू शकते. आम आदमी पक्षावर ट्विटरच्या माध्यमातून नेहमी टीका करताना गंभीर दिसत होता. त्यामुळे भाजपने त्याला राजकारणात येण्याची संधी दिली असल्याचं बोललं जात आहे.

काही आमदारांनी देखील नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी पक्षाच्या अध्यक्षांकडे केली होती. दिल्लीत २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत याचा फायदा झाल्याचा देखील भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं.