वेगानं बॅट्समनना घाबरवणारा फास्ट बॉलर, आता मोटर स्पोर्ट्समध्ये

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉनसननं त्याच्या वेगानं अनेक बॅट्समनना घाबरवलं. 

Updated: Sep 13, 2018, 10:29 PM IST
वेगानं बॅट्समनना घाबरवणारा फास्ट बॉलर, आता मोटर स्पोर्ट्समध्ये

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉनसननं त्याच्या वेगानं अनेक बॅट्समनना घाबरवलं. हाच मिचेल जॉनसन आता वेगाच्या नव्या खेळामध्ये एन्ट्री करतोय. ३६ वर्षांचा मिचेल जॉनसन मोटर रेसिंगमध्ये भाग घेण्याची योजना बनवत आहे. मिचेल जॉनसननं मागच्या महिन्यात क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला होता. जॉनसननं १५३ वनडे, ७३ टेस्ट आणि ३० टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. 

मला आधीपासूनच कार रेसिंगची आवड होती. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यामुळे मला आता यासाठी वेळ मिळाला आहे, असं जॉनसन म्हणाला. मोटर रेसिंग अजिबात सोपं नाही पण मी या नव्या आव्हानासाठी तयार आहे, असं वक्तव्य जॉनसननं केलं आहे. एका चॅरिटी कार्यक्रमासाठी मी रेसिंग केली तेव्हा रेसर बनण्याचा विचार मनात आल्याची प्रतिक्रिया जॉनसननं दिली आहे.

ट्रेनिंग सुरू, लवकरच पदार्पण करणार

पुढच्या आठवड्यामध्ये मी बारबागेलो रेसवेमधून मी रेसिंगच्या दुनियेत पदार्पण करु शकतो, असं जॉनसननं सांगितलं. कॉर्नरवर कार वळवण्याचं आणि ब्रेक-गियरचा योग्य वापर करण्यासाठी सराव गरजेचा आहे. सध्या मी याचं ट्रेनिंग घेत आहे, असं जॉनसन म्हणाला.

क्रिकेटमधून निवृत्ती

आता सगळं संपलं आहे. मी शेवटचा बॉल फेकला आहे. शेवटची विकेटही घेतली आहे. मी क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत आहे. टी-२० लीगमध्ये खेळण्याची आशा मी बाळगली होती. पण आता शरीर साथ देत नाही. मी आयुष्याच्या पुढच्या पानाची सुरुवात करत आहे, असं म्हणत मागच्या महिन्यात जॉनसननं निवृत्ती घेतली होती. जॉनसन आयपीएलमध्ये मुंबई, कोलकाता आणि पंजाबच्या टीमकडून खेळला.

जॉनसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

जॉनसननं ७३ टेस्ट मॅचमध्ये ३१३ विकेट घेतल्या आणि २०६५ रनही केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. १५३ वनडेमध्ये २५९ विकेट आणि ९५१ रन यामध्ये ७३ नाबाद सर्वोत्तम. ३० टी-२०मध्ये ३८ विकेट आणि १०९ रन, यामध्ये २८ सर्वोत्तम