मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघात सध्याच्या घडीला एक वादळ आलं आहे. बऱ्याच वर्षांपासून क्रिकेटसंघात आपलं योगदान देणाऱ्या मिताली राज हिने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला एक पत्र लिहित आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती.
वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या गेलेल्या वर्ल्ड टी२० सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन करुनही मितालीचं नाव अतिशय महत्त्वाच्या सामन्यातून वगळण्यात आलं होतं. संघाच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
मितालीने आपल्यावर झालेल्या याच अन्यायाला वाचा फोडत झाला प्रकार उघड करत प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावरही निशाणा साधला. ज्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तिची पाठराखण करत तिच्यासोबत झालेल्या अन्यायाबद्दल खंत व्यक्त केली आहे.
जवळपास २० वर्षे भारतीय महिला क्रिकेट संघात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मितालीविषयी इंडिया टुडेशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
'ती एका सामन्यासाठी दुखापतग्रस्त होती. पण, पुढच्या सामन्यासाठी मात्र ती पूर्णपणे तयार होती. ही सर्व परिस्थिती पुरुषांच्या क्रिकेट विश्वातीच दृष्टीकोनातून पाहा. जर विराट कोहली एका सामन्यामध्ये दुखापतग्रस्त असता आणि नॉकआऊटसाठी तो ठणठणीत असता तर तुम्ही त्याला संघाबाहेर ठेवलं असतं का?', असं ते म्हणाले.
नॉकआऊट सामन्यांसाठी तुम्हाला मिताली राजसारख्या अनुभवी खेळाडूंची गरज लागतेच, असं ते ठामपणे म्हणाले. त्यासोबतच पोवार यांच्याविषयी फार काही न बोलताही त्यांचा सूर पाहता वक्तव्यातून गावस्कर यांनी नाराजी व्यक्त करण्यात केल्याचं पाहायला मिळालं.