नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिज दरम्यान बॉल कुरतडल्याचा प्रकार समोर आला आणि एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. हे संपूर्ण कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव जगासमोर आला.
ज्या कॅमरामनने हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहेत त्याचा फोटो आणि नाव वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन सार्वजनिक केलं आहे. इतकचं नाही तर सेहवागने या कॅमेरामनचं आपल्याच खास शैलीत कौतुकही केलं आहे.
वीरेंद्र सेहवागने ट्विट करत कॅमरामनचं कौतुक केलं आहे आणि यावेळी 'डॉन' सिनेमातील डायलॉगही सेहवागने म्हटला आहे. "गौर से देखिए इस शख्स को। ऑस्कर- द कैमरामैन, इनके कैमरे से बचना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। #SandpaperGate" असा डायलॉगही सेहवागने लिहीला आहे.
Gaur se Dekhiye is shaks ko. Oscar - the cameraman. Inke camera se bachna mushkil hi nahi namumkin hai #SandpaperGate pic.twitter.com/NH5EGSdbuJ
— Virender Sehwag (@virendersehwag) March 24, 2018
दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला.