"पर्याय शोधा, अन्यथा....," झहीर खानने 2019 वर्ल्डकपची आठवण करुन देत भारतीय संघाला दिला इशारा

World Cup 2023: यंदाचा वर्ल्डकप (World Cup 2023) भारतात होणार सून भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा माजी जलद गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) संघाला इशारा दिला आहे. भारताने चौथ्या क्रमांकावरील फलंदाजासंबंधी विचार करण्याची गरज असल्याचं झहीर खानने सांगितलं आहे.   

Updated: Mar 25, 2023, 01:05 PM IST
"पर्याय शोधा, अन्यथा....," झहीर खानने 2019 वर्ल्डकपची आठवण करुन देत भारतीय संघाला दिला इशारा  title=

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर (ODI Series) भारतीय संघासमोर (Indian Cricket Team) सध्या समस्यांचा डोंगर उभा राहिल्याचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे एकीकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyyer) दुखापतीमुळे बाहेर असताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सपशेल अपयशी ठरला आहे. सूर्यकुमार यादव तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला असून नकोसा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यामुळे भारतासमोर पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न निर्माण झाला असून, 2019 वर्ल्डकपसारखीच स्थिती झाली असल्याचा इशारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलद गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) दिला आहे. 

चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतासमोर चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा मोठा प्रश्न होता. चौथ्या क्रमांकासाठी संघाला नियमित खेळाडू मिळत नव्हता. नेमक्या याच कारणामुळे भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये यशस्वी ठरला नव्हता. भारतीय संघ सेमी फायनल फेरीतून बाहेर पडला होता. यावर्षी पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकप होणार असून भारतीय संघाने चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासंबंधी विचार करणं गरजेचं आहे असा सल्ला झहीरने दिला आहे. 

श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवकडून भारतीय संघाल बऱ्याच अपेक्षा होत्या. पण सूर्यकुमार यादवने संघाची पूर्पणणे निराशा केली आहे. तिन्ही सामन्यांमध्ये तो एकही धाव करु शकला नाही. टी-20 मध्ये तुफान फलंदाजी करत 360 डिग्री प्लेअर अशी उपाधी मिळवणारा सूर्यकुमार यादव एकदिवसीय सामन्यात अपयशी झाल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

"भारतीय संघाला आता आपल्या फलंदाजी क्रमाकडे पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे. त्यांना चौथ्या क्रमांकाच्या पर्यायावर तोडगा काढावा लागणार आहे. 2019 वर्ल्डकपमध्येही हाच चर्चेचा विषय होता. जर आपण चार वर्षांपूर्वीच्या मुद्द्यावर बोलत असू, तर आपण अजूनही त्याच स्थितीत आहोत. मला कल्पना आहे की, चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर आहे. पण जर तुम्ही त्याच्यावर ही जबाबदारी टाकत असाल आणि अवलंबून राहत असाल आणि उद्या जर तो दीर्घ काळासाठी जखमी झाला तर काय पर्याय असेल याची उत्तरं शोधण्याची गरज आहे," असं झहीर खान Cricbuzz शी बोलताना म्हणाला आहे. 

सूर्यकुमार यादव अपयशी ठरला असला तरी कर्णधार रोहित शर्माने मात्र त्याची पाठराखण केली आहे. सामना संपल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्याने सूर्यकुमार यादवला पूरेशी संधी दिली पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच तो फक्त तीन चेंडू खेळला किंवा तीन सर्वोत्तम चेंडूंचा सामना केला असं म्हणावं लागेल असं सांगितलं. मात्र यावरुन काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी नाराजी जाहीर केली आहे. काही मोजक्या खेळाडूंना संरक्षण दिलं जात असल्याचं हे योग्य उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली आहे.