भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) नेहमीच आपल्या गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानात किंवा मैदानाबाहेर तो उगाच टिंगलटवाळ्या किंवा हसताना दिसत नाही. एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. क्रिकेटमध्ये सक्रीय असताना तो नियमितपणे भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये होता. आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आणि विजयी व्यक्तिमत्व यामुळे अनेकदा त्याला अहंकारी समजलं जातं असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bharadwaj) म्हणाले आहेत.
भारद्वाज हे दिल्ली क्रिकेटमध्ये एक प्रसिद्ध प्रशिक्षक आहेत, ज्यांनी अमित मिश्रा आणि जोगिंदर शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंचं भवितव्य घडवलं आहे. पण गंभीरसोबतचा त्यांचा प्रवास फार मोठा आहे, जो तीन दशकांहून अधिक काळचा आहे. 2019 मध्ये गुरू द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त करणारे भारद्वाज यांनी गंभीरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. गंभीर 12-13 वर्षांचा असतानाही त्याला पराभव मान्यच नव्हता अशी आठवण त्यांनी सांगितली.
"गौतम गंभीर हा लहान मुलगा आहे. आजही तो एका निष्पाप मुलासारखा आहे. त्याच्यात कोणताही द्वेष नाही. तो 12 वर्षांच्या मुलासारखा आहे. लोकांना वाटते की तो गर्विष्ठ आहे, पण जिंकण्याची त्याची वृत्ती आहे. मी त्याला नेटनंतर क्रिकेट सामना खेळायला लावायचो. सामना गमावल्यानंतर तो रडत असे. त्याला तेव्हाही हारणे आवडत नव्हते,” असं भारद्वाज यांनी भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या मनजोत कालराच्या यूट्यूब शोमध्ये सांगितले.
"म्हणून, त्याच्यासारखे खरं व्यक्तिमत्त्व असणारी व्यक्ती नक्कीच गंभीर राहील. जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आलात, जर तुम्ही सतत हसत असाल, तर तुम्ही जिंकाल. ज्या व्यक्तीला जिंकायचं आहे त्याला पराभव कसा टाळायचा हे माहिती असायला हवं. लोकांना वाटतं की गंभीर अंहकारी आहे. नाही, तो मनाने फार स्वच्छ आहे. तो शांत असून त्याने अनेक तरुणांचं करिअर घडवलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.
1991 मध्ये गौतम गंभीर भारद्वाज यांच्याकडे प्रशिक्षणासाठी आला होता आणि तेव्हापासून दोघांचेही जवळचे संबंध आहेत. गंभीर भारतीय संघातून बाहेर असतानाही, 2018 पर्यंत जेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली तेव्हापर्यंत तो सतत भारद्वाज यांच्याशी संपर्क साधत असे. गंभीर आपला शिष्य असल्याचा त्यांना फार अभिमान आहे.
दरम्यान श्रीलंकेतील भारतीय संघाच्या कामगिरीनंतर गौतम गंभीरच्या रणनितीवर टीका होत आहे. यावरही संजय भारद्वाज यांनी भाष्य केलं आहे. "गौतम गंभीर तांत्रिक बाबींचा विचार करत त्याच्या मागे जाणार नाही. कारण त्या पातळीवर तांत्रिक सुधारणेची गरज नाही. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या पुरेसे चांगले आहात म्हणूनच त्या स्थानी आहात. गंभीर रणनीतिक पैलूंवर काम करेल. गंभीरचे काम संघाचं मनोबल वाढवणं असेल. ज्यांना स्वत:बद्दल खात्री नाही त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याची खात्री तो करेल," असं ते म्हणाले.
"गंभीरने तीन महिन्यांपूर्वी सुनील नरेनला सांगितले होते की, त्याला त्याच्याकडून गोलंदाजी नको आहे आणि त्याने त्याच्या फलंदाजीवर काम केले पाहिजे. जर गंभीरला वाटत असेल की एखादा खेळाडू सामने जिंकू शकतो, तर तो त्याला मदत करेल. हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. प्रशिक्षकाकडे निर्भयपणा आणि जिंकण्याची सवय असा दृष्टिकोन असणं आवश्यक आहे," असंही त्यांनी सांगितलं.