Team India: टी 20 वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरु आहे. कोणता खेळाडू अंतिम 15 मध्ये असेल याचे आखाडे बांधले जात आहे. दरम्यान, भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने 2022 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. गंभीरने निवडलेल्या संघातून मोठ्या खेळाडूंना बाहेर काढले आहे.
रोहित आणि इशान यांची सलामीवीर म्हणून निवड
आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी गौतम गंभीरने आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. या संघात सलामीची जबाबदारी त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यावर सोपवली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीला संघात स्थान देण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानासाठी निवड केली आहे. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी गंभीरने या 4 खेळाडूंची निवड केली आहे.
पंत-कार्तिक दोघं संघाबाहेर
गौतम गंभीरच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऋषभ पंतसोबतच या अनुभवी खेळाडूने फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं नाही. या दोन खेळाडूंना बाहेर ठेवून गंभीरने केएल राहुलची संघाचा यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. दिनेश कार्तिक गेल्या काही दिवसात टीम इंडियाचा सर्वात धडाकेबाज फिनिशर म्हणून उदयास आला आहे. परंतु कार्तिकला केवळ 3-4 षटकांच्या कामासाठी संघात ठेवता येणार नाही, असे गंभीरचे मत आहे.
हार्दिकसोबत दीपक हुडाला संधी
याशिवाय गंभीरने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला असून रवींद्र जडेजाऐवजी दीपक हुडाला संघात संधी दिली आहे. हुडाने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. याशिवाय त्याने हार्दिक पांड्याची फिनिशर म्हणून निवड केली आहे. गोलंदाजी क्रमवारीत गंभीरने हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहला स्थान दिले.
टी 20 वर्ल्डसाठी गंभीरने निवडलेली प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजी चहल, जसप्रीत बुमराह