मुंबई : हार्दिक पांड्या आज टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. आज पंड्या आपला २४वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा खेळ पाहून त्याचं मोठमोठ्या दिग्गजांकडूनही केलं जात आहे.
हार्दिक हा कपिल देवपेक्षाही चांगला ऑलराउंडर असल्याचंही काहींनी म्हटलं आहे. आज क्रिकेट जगतात हार्दिकला जी काही प्रसिद्धी लाभली आहे ती केवळ आणि केवळ त्याच्या मेहनतीमुळे! अतिशय कठीण परिस्थितीमधून स्वत:ला सावरत हार्दिकने यशाचे शिखर गाठले आहे. चला जाणून घेऊया त्याच्या जीवनातील काही खास गोष्टी....
हार्दिक आणि कृणाल पांड्याचे गुरू किरण मोरे
डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन हार्दिक आणि कृणालचे वडील किरण मोरेंच्या अकादमीत गेले. किरण मोरे हे भारताचे माजी खेळाडू आणि यष्टीरक्षक होते. जेव्हा हार्दिकच्या वडिलांनी किरण मोरे यांना आपल्या मुलांना शिकवण्याची विनंती केली, तेव्हा किरण मोरे यांनी वयामुळे त्यांचा प्रवेश नाकारला. कारण तेव्हा कृणाल हा ७ आणि हार्दिक फक्त ५ वर्षाचा होता. अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी १२ वर्ष वय असणे गरजेचे होते. परंतु हार्दिकच्या वडीलांच्या आग्रहापुढे किरण मोरे झुकले आणि त्यांनी या दोघांना फलंदाजी करण्याची एक संधी दिली. या दोन बंधूनी देखील मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि किरण मोरेंना आपल्या जबरदस्त फलंदाजीने प्रभावित केलं. त्यांच्यातली क्रिकेटनिष्ठा ओळखून किरण मोरे यांनी हार्दिक आणि कृणाल दोघांना अकादमीत प्रवेश दिला. तेथून पुढे स्वत:च्या कर्तुत्वाने, जिद्दीने स्वत:ला सिद्ध करत दोन्ही बंधूंनी यशाला गवसणी घातली, पण कृणाल पेक्षा जास्त यशस्वी ठरला, त्याचा लहान धडकेबाज बंधू हार्दिक पंड्या!
१. हार्दिक पंड्याचे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते, कधी कधी तर एक वेळच्या जेवणाची देखील वानवा होत असे.
२. हार्दिकच्या क्रिकेट करिअरसाठी त्याच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे. फक्त मुलांना योग्य असे क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ते परवडत नसून देखील सुरत मधून बांद्रयाला राहायला आले.
३. किरण मोरे यांनी ३ वर्ष त्यांच्या अकादमीत असताना हार्दिककडून कोणतीच फि आकारली नाही.
४. हार्दिकला त्याचे सह खेळाडू “रॉकस्टार” या नावाने संबोधतात.
५. इरफान पठाण आणि युसुफ पठाण हे दोन त्याचे खूप जवळचे मित्र आहेत.
६. लोक त्याला बडोद्याचा वेस्ट इंडियन म्हणून संबोधतात, कारण त्याचे वर्तन आणि वैशिष्ट्ये तशीच आहेत.
७. २०१५ मध्ये जॉन राईटने हार्दिकमधील टॅलेंट ओळखले होते आणि त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी करून घेतले.
८. हार्दिक नववी मध्ये नापास झाला होता, त्यानंतर त्याने शिक्षण सोडून फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.
९. सुरुवातीला हार्दिक लेग स्पिनर होता परंतु किरण मोरे यांच्या मदतीने तो मध्यमगतीचा गोलंदाज होऊ शकला.
१०. सय्यद मुश्ताक़ अली ट्रॉफी मध्ये हार्दिकने दिल्ली विरुद्ध जोरात फटकेबाजी करत एकाच षटकात ३९ धावा धावफलकावर झळकावल्या होत्या.