'अख्ख्या मोहल्ल्याचं पाठवलं का?', भरमसाठ लाईट बिल बघून क्रिकेटपटू संतापला

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे.   

Updated: Jul 26, 2020, 09:47 PM IST
'अख्ख्या मोहल्ल्याचं पाठवलं का?', भरमसाठ लाईट बिल बघून क्रिकेटपटू संतापला

मुंबई : कोरोनाचा वाढता वाढता कहर आणि वीज बिलाचा आकडा पाहून सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे. आता या वाढत्या वीज  बिलाचा फटका फिरकीपटू क्रिकेटर हरभजन सिंगला देखील बसला आहे. वीज कंपनीकडून त्याला सुद्धा आवाच्या सव्वा बिल पाठवण्यात आलं आहे. खुद्द हरभजनने त्याला आलेलं वीज बिल सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. बिलासंबंधीचा मेसेज त्याने तसाच्या तसा ट्विट केला असून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

'अख्ख्या मोहल्ल्याचं पाठवलं का?' असं ट्विट करत त्याने आपल्या बिलाची रक्कम सांगितली आहे. हरभजनला ३३९०० रूपये इतकं वीज बिल आलं असून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांनी हे बिल भरण्यासाठी त्याला १७ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीजबिलाचा मुद्दा सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. यापूर्वी तापसी पन्नू, रेणुका शहाणे, हुमा कुरेशी, अभिनेता अर्शद वारसी  यांनी देखील वाढत्या बिलाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य केलं होतं. 

एकंदर वाढीव वीज बिलानं फक्त सर्वसामान्यच नव्हे, तर सेलिब्रिटी मंडळींनाही जोर का झटका लागला आहे हेच चित्र दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढता वीजेचा वापर आणि एप्रिलपासून वाढलेले वीजदर यामुळे वीज बिलात वाढ झाल्याचं  तज्ज्ञांचं म्हणणं आहे.