मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी क्रिकेटर हार्दिक पांड्या अडचणीत आलाय. जोधपूरच्या विशेष एससी/एसटी कोर्टाने पोलिसांना हार्दिकविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारलीये.
पांड्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे डी. आर. मेघवाल यांच्या म्हणण्यानुसार, २६ डिसेंबर २०१७मध्ये पांड्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात विधान केले होते. या पोस्टात पांड्याने केवळ डॉ. आंबेडकरांचाच अपमान केला नाही तर दलित समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप मेघवाल यांनी केलाय.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेघवाल यांच्या मते पांड्याने कोण आंबेडकर? असे ट्वीट केले होते. तसेच पांड्याने ट्विटमध्ये ती व्यक्ती ज्यांनी देशाचे संविधान लिहिलेय वा ते ज्यांनी देशाला आरक्षण नावाचा आजार दिला, असे म्हटल्याचा आरोप मेघवाल यांनी केलाय. मेघवाल खुद्द राष्ट्रीय भीम सेनाचे सदस्य असल्याचे सांगतात.