Hardik Pandya No Look Shot To Taskin Ahmed Video: नो-लूक शॉट तुम्ही क्रिकेटमध्ये यापूर्वीही पाहिले असतील यात शंका नाही. मात्र या शॉटपैकी सर्वोत्तम फटका कोणता असा प्रश्न विचारल्यास भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने लगावलेल्या शॉटचा उल्लेख करता येईल. रविवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर हार्दिकने लगावलेला एक फटका सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
भारतीय संघ सहज सामना जिंकणार अशा स्थितीत असताना हार्दिक पंड्याला सामना लवकर संपवण्याचा घाई लागली आहे की काय अशा पद्धतीने तो फलंदाजी करत होता. भारतासमोर 128 धावांचं लक्ष्य असताना भारतीय संघ 116 वर 3 बाद अशा स्थितीत होता. भारताला विजयासाठी अवघ्या 12 धावांची आवश्यकता असताना तस्कीन 12 वी ओव्हर टाकायला आला. तस्कीनने ओव्हरमधील तिसरा चेंडू हा अखूड टप्प्याचा म्हणजेच शॉर्ट बॉल टाकला. हा चेंडू हार्दिकच्या अंगावर येईल अशा पद्धतीने तस्कीनने स्वींग केला होता. मात्र पंड्याने तो तितक्याच किंबहुना अधिक भन्नाट पद्धतीने खेळून काढला.
हार्दिकने अंगावर येणाऱ्या या शॉर्ट पीच बॉलला केवळ बॅट लावत तो विकेटकीपरच्या डोक्यावरुन मागील बाजूस टोलावला. हा फटका खेळताना हार्दिकचा आत्मविश्वास इतका होता की बॅटचा बॉल लागल्यानंतर बॉल कोणत्या दिशेने गेलाय हे पाहण्याचं कष्टही हार्दिकने घेतलं नाही. पांड्याने फटका मारल्यानंतर चेंडू कुठे गेला हे पाहण्याऐवजी तस्कीनला अगदी डेथ स्टेअर म्हणतात तसा खाऊ की गिळू असा लूक दिला. हार्दिकने मारलेला फटका पाहून तस्कीनला विश्वास बसत नव्हता की एवढ्या चांगल्या चेंडूवर हा फटका लगावण्यात आला आहे. दुसरीकडे कॉमेंट्री बॉक्समधून समालोचकाने हा असा फटका केवळ पांड्याच मारु शकतो असं म्हणत या अष्टपैलू खेळाडूचं कौतुक केलं. हार्दिकने लागवलेला हा शॉट एकदम परफेक्ट आणि यापूर्वी कधीही पाहिला नाही असा असल्याचं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. हा आपण पाहिलेला सर्वोत्तम नो-लूक शॉट असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी या शॉटला जगात भारी शॉट असं म्हटलंय. तुम्हीही हा व्हिडीओ एकदा पाहाच...
1)
My best player hit kind of shots in IranAttack #IndvsBan first T20i
Best shot by #HardikPandya t20 pic.twitter.com/aApBuv0eVZ— nitu vijendra choudhary (@nitu12dara) October 6, 2024
2)
No one noticed this !!
Hardik Pandya mocking SKY with a chewing gum action
— (@i_boulti) October 7, 2024
हार्दिकचा हा नो लूक शॉट चर्चेत असला तरी त्याने या सामन्यात केलेली कामगिरी खरोखरच तो संघासाठी या छोट्या फॉरमॅटमध्ये किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करुन गेली. त्याने एक विकेट घेतली आणि दोन षटकार तसेच पाच चौकारांच्या मदतीने 16 बॉलमध्ये नाबाद 39 धावा केल्या. पांड्याच्या या कामगिरीमुळे भारताचा विजय सुखकर झाला आणि भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. भारताने 49 बॉल शिल्लक असतानाच सामना जिंकला हे ही विशेष आहे.