ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा 'हाईवोल्टेज ड्रामा'; अंपायरच्या वादग्रस्त निर्णयावर भडकला कर्णधार

मैदानावर एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला.

Updated: Oct 22, 2022, 07:22 PM IST
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा 'हाईवोल्टेज ड्रामा'; अंपायरच्या वादग्रस्त निर्णयावर भडकला कर्णधार title=

सिडनी : वर्ल्डकपसोबतच ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धा सुरु आहे. दरम्यान या स्पर्धेदरम्यान मैदानावर एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. मुख्य म्हणजे अनेकदा बॅड लाईट म्हणजेच खराब प्रकाशामुळे खेळ थांबतो. मात्र या सामन्यात खराब प्रकाशामुळे खेळ थांबला नाही तर थेट एका टीमचा विजय झाल्याचं घोषीत करण्यात आलं. यामुळेच एक धक्कादायक प्रकार मैदानावर घडला.

या सामन्यात सिडनीच्या ड्रोमोयने ओव्हलवर शेवटच्या 5 ओव्हरमध्ये क्वीन्सलँडला विजयासाठी 26 रन्सची गरज होती. यावेळी क्वीन्सलँडचा विजय निश्चित होता. मात्र यावेळी घडलं काहीतरी उलटंच.

क्वीन्सलँडचे फलंदाज जो बर्न्स आणि मॅट रेनशॉ यांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये 10 रन्स केले, त्यानंतर लक्ष्य केवळ 16 रन्सचं उरलं. परंतु यानंतर मैदानावरील अंपायरन्सने एक वादग्रस्त निर्णय घेतला. संध्याकाळी 6.34 च्या सुमारास लाईट रीडिंग घेतल्यानंतर खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानंतर क्वीन्सलँडचा कर्णधार उस्मान ख्वाजा मैदानात उतरला आणि त्याने अंपायर्सना प्रश्न केला की, फलंदाजांना काही अडचण नसताना खेळ का सुरू ठेवू शकत नाही.

दरम्यान या प्रकारात क्वीन्सलँडचे दोन्ही सलामीवीर जो बर्न्स आणि रेनशॉही मैदान सोडायला तयार नव्हते. अशातच सामना ड्रॉ झाल्याच्या आनंदात विरोधी टीमच्या खेळाडूंनी आनंदाच्या भरात ड्रेसिंग रूममध्ये धाव घेतली.

या सर्व प्रकरणानंतर अंपायर्सने बेल्स टाकून सामना ड्रॉ झाल्याचं घोषित केलं. क्वीन्सलँडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल नेसर सामना संपल्यानंतर म्हणाला, 'आम्हाला अपेक्षित होता तो हा रिझल्ट नाही. संपूर्ण सामन्यात आम्ही खूप चांगला खेळ आणि संघर्ष केला. मात्र याचा रिझल्ट फार निराशाजनक होता."