हिमा दासची 'सुवर्ण' दौड; एका महिन्यात ५ सुवर्णपदकांची कमाई

हिमा दास भारताची नवी सुवर्णकन्या

Updated: Jul 21, 2019, 06:12 PM IST
हिमा दासची 'सुवर्ण' दौड; एका महिन्यात ५ सुवर्णपदकांची कमाई title=

मुंबई : भारताची नवी सुवर्णकन्या हिमा दासने ऍथलेटिक्स विश्वात आपल्या कामगिरीने खळबळ माजवली आहे. धावपटू हिमाने एका महिन्यात पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. हिमाने आपल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. 

ढिंग एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेली धावपटू हिमा दासने आपल्या कामिगिरीने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. तिने एका महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. हिमाने चेक गणराज्यमध्ये झालेल्या मेस्टो ग्रां.प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंद वेळेची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हिमा दासने या हंगामातील सर्वोत्तम वेळेची नोंद केली. गेल्या काही दिवसांपासून हिमा दासचा सुवर्णपदकांचा धडाका सुरू आहे.

हिमानं २ जुलैला २०० मीटर शर्यतीत २३.६५ सेकंदासह पहिले सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर ७ जुलैला पोलंडमध्ये झालेल्या कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत २३.६५ सेकंदांची नोंद करत दुसरे सुवर्णपदक पटकावले. 

यानंतर १३ जुलैला क्लांदो मोमेरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली. या स्पर्धेतही २०० मीटर शर्यतीत २३.४३ सेकंदाची वेळ नोंदवली. १८ जुलैला टाबोर ग्रां प्रीमध्ये हिमाने २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांची वेळ नोदंवत तिसरे सुवर्णपदक पटकावले. तर २० जुलैला नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री ४०० मीटर शर्यतीत ५२.०९ सेकंदांसह पाचव सुवर्णपदक मिळवले. 

विशेष म्हणजे हिमा केवळ आपल्या यशामध्येच अडकून पडलेली नाही. तिने आपल्या पगारातील अर्धी रक्कम ही आपलं राज्य असलेल्या आसाममधील पूरग्रस्तांना जाहीर केली. हिमाची ही सुवर्ण दौड अशीच सुरु राहो आणि तिने भारताला अधिकाधिक सुवर्ण पदकांची कमाई करुन देत तिची यशस्वी वाटचाल सुरु राहो.