Indian Hockey Hardik Singh out with injury: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा 2023 चं यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली असून हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना वेल्ससोबत असणार आहे. असं असताना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. मिडफिल्डर हार्दिक सिंग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वेल्स विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर दुखापत पाहता पुढील सामन्यात खेळेल की नाही, याबाबतही साशंकता आहे. हार्दिक दुखापत पाहता रविवारी रात्री एमआरआय करण्यात आलं आहे.
हार्दिक हा भारतीय फळीतील सर्वोत्तम खेळाडू आहे. स्पेन आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याची खेळी जबरदस्त होती. त्यामुळे त्याची उणीव वेल्सविरुद्धच्या सामन्यात जाणवेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. जर हार्दिक दुखापतीतून सावरला नाही तर त्याऐवजी संघात राजकुमार पाल याला संधी मिळू शकते. मिडफिल्डर राजकुमार आणि डिफेंडर जुगराज सिंग या दोन खेळाडूंची राखीव खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली होती. पण राखीव खेळाडूला एकदा संघात स्थान मिळालं तर हार्दिकला संघात परतणं कठीण होईल.
बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा
हॉकी फेडरेशनच्या नियमानुसार, 18 खेळाडूंच्या चमुत एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि त्याऐवजी संघात राखीव खेळाडूची निवड झाली. तर दुखापतग्रस्त खेळाडू बरा झाला तरी संघात कमबॅक नसतं. त्यामुळे हार्दिक दुखापत मोठी नसावी अशी प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहेत.
बातमी वाचा- Hockey WC 2023: "मला वाईट वाटते की, भारतात...", बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप
ग्रुप डी मध्ये भारत, वेल्स, इंग्लंड आणि स्पेन हे चार संघ आहेत. इंग्लंड आणि भारताने एक एक सामना जिंकला आहे. तर भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना बरोबरीत सुटल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. भारत आणि इंग्लंडच्या पारड्यात प्रत्येकी तीन गुण आहेत. मात्र इंग्लंडची गोलची संख्या पाहता पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी पुढील सामना महत्त्वाचा आहे. 19 जानेवारील इंग्लंड विरुद्ध स्पेन आणि भारत विरुद्ध वेल्स हा सामना रंगणार आहे. ग्रुप डी मधील सलामीच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे.