...असा रचला 'ज्युनिअर' टीम इंडियानं इतिहास!

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं १९ वर्षाखालील विश्वचषकाला गवसणी घातली. अंतिम सामन्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. मनज्योत कालराच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघानं चौथ्यांदा जगज्जेते पदाचा मान पटकावला.

Updated: Feb 3, 2018, 06:38 PM IST
...असा रचला 'ज्युनिअर' टीम इंडियानं इतिहास! title=

मुंबई : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं १९ वर्षाखालील विश्वचषकाला गवसणी घातली. अंतिम सामन्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. मनज्योत कालराच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघानं चौथ्यांदा जगज्जेते पदाचा मान पटकावला.

न्यूझीलंडच्या माऊंट माऊनगानुई मैदानावर भारतीय संघानं चौथ्यांदा विश्वचषक जिंकत इतिहास रचला. आतापर्यंत क्रिकेटच्या दुनियेत जे कोणत्याही संघाला जमलं नाही. ते भारतीय संघानं शक्य करुन दाखवलंय. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ चौथ्यांदा जगज्जेता झाला. 

दिल्लीकर मनज्योत कालरानं भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यानं नाबाद १०१ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याच्या शतकामुळेच भारतीय संघाला अजिंक्यपद पटकावता आला.

बॅटसमनची दमदार कामगिरी

ऑस्ट्रेलियानं भारतीय संघासमोर विजयासाठी २१६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ७१ धावांची दमदार सलामी दिली... आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. पृथ्वी २९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर मनज्योतनं सामन्याची सारी सुत्र आपल्या हाती घेतली. त्यानं भारतीय डावाची आणखी पडझड होऊ दिली नाही आणि एक बाजू लावून धरली. त्याला हार्विक देसाईनं मोलाची साथ दिली... आणि भारचीय संघ विश्वविजेता झाला.

मनज्योत कालरानं १०२ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत ८ खणखणीत चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

बॉलर्सनं उडवली दाणादाण

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सामन्यातही आपल्या गोलंदाजीची छाप सोडली. ईशान पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी, अनुकुल रॉय आणि शिवम मावीनं भेदक मारा करत कांगारुंना २१६ धावांवर रोखलं... आणि गोलंदांजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. 

संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या संघानं मैदानावर चॅम्पियनसारखा खेळ केला. भारताला या विश्वचषकात अखेरपर्यंत कुठलाही संघ आव्हानच देऊ शकला नाही... आणि भारतीय संघ या संपुर्ण विश्वचषकात अपराजित राहिला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x