मुंबई : बुकींनी तीनवेळा संपर्क केल्यानंतरही याची माहिती आयसीसीला न दिल्यामुळे बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसनचं एका वर्षासाठी निलंबन झालं आहे. यानंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगबाबत गौप्यस्फोट केले आहेत. माझ्याबरोबर अनेक मॅच फिक्सर खेळले. मी विरोधी टीमच्या ११ आणि आपल्या टीममधल्या १० अशा २१ खेळाडूंविरोधात खेळायचो, असं शोएब अख्तर म्हणाला आहे.
मोहम्मद आसिफने आम्ही कशाप्रकारे आणि कोणत्या मॅच फिक्स केल्याचं सांगितलं. फिक्सिंगबद्दल ऐकल्यानंतर मला वेदना आणि दु:ख झालं. आमिर आणि आसिफला मी असं न करण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी ऐकलं नाही. या गोष्टी मला कळल्या तेव्हा मी भिंतीवर पंच मारून राग काढला. पाकिस्तानचे दोन सर्वोत्तम फास्ट बॉलर वाया गेले. थोड्याश्या पैशांसाठी त्यांनी स्वत:ला विकलं, अशी प्रतिक्रिया अख्तरने दिली.
मॅच फिक्सिंग प्रकरणी २०११ साली पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहम्मद आमिर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट यांचं ५ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. यानंतर मोहम्मद आमिरने क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही आमिर खेळला. पण वयाच्या २७व्या वर्षी आमिरने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रीत करण्यासाठी टेस्ट क्रिकेट सोडत असल्याचं आमिरने सांगितलं.