India vs New zealand | न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला, विराटबाबत म्हणाला, तो....

न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्याने टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे.

Updated: Nov 1, 2021, 09:45 PM IST
India vs New zealand | न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला, विराटबाबत म्हणाला, तो....  title=

मुंबई : टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने या स्पर्धेतील पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. तर टीम इंडियाच्या पहिल्या विजयाचा शोध अजूनही सुरुच आहे. या पराभवामुळे टीम इंडियाला पर्यायाने विराट कोहलीवर जोरदार टीका केली जात आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने टीम इंडियाच्या सेमी फायनलपर्यंत पोहचण्याचा मार्ग फार अवघड झाला आहे. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी सलामवीर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे. (icc t 20 mens world cup 2021 india vs new zealand former indian opener gautam gambhir critisized team india due to lost against new zealand)

गंभीर काय म्हणाला? 

"टीम इंडियामध्ये प्रतिभावान खेळाडू आहेत. टीम म्हणून द्वीपक्षीय मालिकांमध्ये आणि अन्य बाबतीत चांगली कामगिरी करता. पण जेव्हा अशा मोठ्या स्पर्धेत यापेक्षा चांगली कामगिरी करणं अपेक्षित असतं. या अशा स्पर्धांमध्ये चुकीला स्थानचं नसतं", असं गंभीर म्हणाला. तो ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलत होता.

न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा क्वार्टर फायनलसारखा होता. टीम इंडियाच्या आत्मविश्वासात उणीव होती. जेव्हा तुम्हाला समजतं की सामना जिंकायचा आहे, तेव्हा तुम्हाला चूक करुन चालत नाही. तर हीच बाब द्विपक्षीय सामन्यांमध्ये क्षम्य असते कारण तिथे चुका करु शकता. मात्र अशा प्रकारच्या मोठ्या सामन्यांमध्ये तुम्ही चूक करु शकत नाहीत. मला वाटतं की टीम इंडियाच्या आत्मविश्वासात कमतरता होती", असं गंभीरने नमूद केलं. 

विराटबाबत काय म्हणाला? 

"असं नाहीये की विराट दबावात चांगलं करु शकत नाही. पण हो, विराट अशा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये कामगिरी करु शकत नाहीये. बाद फेरीतील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विराट धावा करण्यात अपयशी ठरतोय. कदाचित विराट मानसिकरित्या मजबूत नसल्यानं हे असं होत असावं", असं गंभीरने स्पष्ट केलं.