World Cup 2023 India vs Afghanistan : टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची (Mission World Cup) दणक्यात सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा (India beat Australia) पराभव करत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालीय. 11 ऑक्टोबरला भारतीय संघ अफगाणिस्तानशी (India vs Afghanistan) दोन हात करेल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल.
सामन्याआधी टीम इंडियाला धक्का
चेन्नईत ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर टीम इंडिया आता दिल्लीत दाखल झाली आहे. पण दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का देणारी बातमी समोर आलीय. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू दुसऱ्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नाही. या सामन्यात शुभमन गिलची कमी जाणवली होती. आता अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. डेंग्यूतून बरं व्हायरला किमान आठ ते दहा दिवस लागतात. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही गिल खेळण्याची शक्यता कमीच आहे.
शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्ध खेळू न शकल्यास टीम इंडियाला हा मोठा धक्का असणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिलच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. गिल टीमबरोबर दिल्लीला रवाना झाला असून तो टीमबरोबबरच राहाणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी गिल मैदानात उतरले असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानादरम्यान महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
ईशान किशन फ्लॉप
शुभमन गिल आजारी असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्य सामन्यात रोहित शर्माबरोबर विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने भारतीय डावाची सुरुवात केली. पण सामन्याच्या पहिल्याच षटकात ईशान किशन बाद झाला. त्याला खातंही खोलताही आलं नाही. दुसरीकडे रोहित शर्माही भोपळ्यावर बाद झाला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही आल्या पावली परतला. भारताची अवस्था 2 धावांवर 3 विकेट अशी होती.
पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने संयमी फलंदाजी करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 85 तर केएल राहुलने नाबाद 97 धावा केल्या.