मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. या सगळ्या चर्चांवर खुद्द इम्रान खान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाकिस्तानमधल्या एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी लग्नाच्या चर्चांवर भाष्य केलं.
बुशरा मनेका यांचा घटस्फोट झाल्यावर मी तिला लग्नासाठी मागणी घातल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत. माझ्या या मागणीचं काय होणार ते आता देवालाच माहिती, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली आहे. मनेकाच्या कुटुंबाला मी याबद्दल जास्त बोललेलं आवडणार नाही, असंही इम्रान खान म्हणाले.
मनेकाला मी दोन वर्षांपूर्वी भेटलो होतो. लग्नाबद्दल मनेकाकडून मला अजून कोणतंही उत्तर मिळालं नाही. गोष्टी पुढे गेल्या तर याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन, असं इम्रान खान यांनी सांगितलं.