रोहित लढला खरा, टीम इंडियाचा पराभव नाही टळला, बांगलादेशचा मालिका विजय!

बांगलादेशकडून टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव

Updated: Dec 7, 2022, 08:29 PM IST
रोहित लढला खरा, टीम इंडियाचा पराभव नाही टळला, बांगलादेशचा मालिका विजय! title=

Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमधील (IND vs BAN) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात बांगेलादेशने 5 धावांनी विजय मिळवला आहे. मेहंदी हसनच्या (Mehidy Hasan) शतकी आणि  महमदुल्लाहच्या (Mahmudullah) अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने (Bangladesh) 271 धावा केल्या होत्या. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 266 धाव करता आल्या. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका जिंकली आहे.  (india loss 2nd odi match against bangladesh)

बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. रोहित (Rohit Sharma) जखमी झाला होता म्हणून विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) सलामीला आले होते. विराट 5 धावांवर माघारी परतला त्यानंतर लगोलग शिखर धवनही बाद झाला. चार नंबरला वॉशिंग्टन आल्याने सर्वजण चकित झाले मात्र त्याला चमक दाखवता आली नाही. 11 धावा करून तोही बाद झाला. श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली होती तर दुसरीकडे के. एल. राहुलही बाद झाला. त्यामुळे  टीम इंडिया आजही ऑल आऊट होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

श्रेयस अय्यर (Shreyas Ayyar) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांनी भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. श्रेयस अय्यरही मोठा फटका खेळण्याच्या नादात 82 धावांवर बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलही 56 धावांवर बाद झाला. सामना संपला असं वाटत होतं मात्र रोहित शर्मा 10 व्या क्रमांकावर खेळायला आणि सामन्यात पुन्हा ट्विस्ट आला. 

रोहितने आल्यावर तुफान फटकेबाजी केली, अवघ्या 28 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या षटकात 20 धावांची गरज होती. रोहितने दोन चौकार मारले एक चेंडू वाईड गेला. भारताला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज होती, रोहितने षटकार खेचत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं मात्र पुढच्या चेंडू यॉर्कर टाकत रहमानने सामना जिंकून दिला. 

बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. मात्र बांगलादेशची (Bangladesh) सुरूवात चांगली झाली नव्हती. बांगलादेशचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. अनामुल हक 11, लिंटन दास 7, नजमुल शांतो 21, शकिब अल हसन 8, मुशफिकर रहिम 12 असे एका मागो माग एक झटपट विकेट पडले. टीम इंडियाच्या बॉलर्सना हे विकेट घेण्यात यश आलं होतं.

सामन्यात बांगलादेश बॅकफुटला गेल्याचे चित्र होतं. मात्र मैदानात उतरलेल्या महमदुल्लाह आणि मेहंदी हसनने डाव सांभाळत संपुर्ण चित्रच बदलून टाकले. महमदुल्लाहने (Mahmudullah) 77 धावांची आणि मेहंदी हसनने (Mehidy Hasan) 100 धावांची शतकी खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट बॅटींगच्या बळावर बांगलादेशने 7 विकेट गमावून 271 धावा ठोकल्या.  टीम इंडियाकडून वॉशिग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट, मोहम्मद सिराद आणि उमरान मलिकने (Umran Malik) प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये बांगलादेशने  2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला नाहीतर व्हाईटवॉश मिळणार.