मुंबई : टीम इंडियाला बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 247 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण ते पूर्ण करण्यात टीम इंडिया अपयशी ठरली. टीम इंडिया अवघ्या 146 रन्सवर ऑलआऊट झाली आणि या सामन्यात त्यांना 100 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.
या पराभवामुळे तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली असून 17 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यातून मालिकेचा निकाल लागेल.
इंग्लंडसाठी या सामन्याचा हिरो रीस टॉप्ली ठरला. त्याने 9.5 ओव्हरमध्ये 6/24 विकेट्स घेत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. टॉप्लीने रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव या फलंदाजांच्या विकेट घेतल्या. शेवटी मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचीही विकेट त्याने काढली.
247 रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची चांगलीच नाकीनऊ आली. भारताचे दोन्ही ओपनर स्वस्तात माघारी परतले. रोहित शर्मा आणि पंत खातंही उघडू शकले नाहीत. दुसरीकडे शिखरही 9 तर कोहली 16 धावा करुन तंबूत परतले.
यानंतर सूर्यकुमारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो देखील 27 रन्सवर माघारी परतला. जडेजाने पांड्यासोबत खेळ सावरला मात्र दोघंही 29 रन्सवर करुन बाद झाले. अखेरीस हा सामना इंग्लंडने 100 रन्सनी जिंकला.