जिंकलेला टॉस आणि एका भागीदारीने भारत मजबूत स्थितीत

रोहित आणि रहाणेच्या भागीदारीने भारताची स्थिति मजबूत केली आहे हे इंग्लंडच्या ड्रेसिंग रूम मधल्या प्रशिकांच्या चिंतातुर नजरेतून दिसून आले.

Updated: Feb 13, 2021, 06:00 PM IST
जिंकलेला टॉस आणि एका भागीदारीने भारत मजबूत स्थितीत title=

रवि पत्की, झी मीडिया, मुंबई: कोहली शून्यावर बाद झाल्याने भारतीय फॅन्स निराश झाले तरी ह्या खेळपट्टीवर त्याने टॉस जिंकला ही भारतीय संघाला त्याने लॉटरी लावून दिली असे म्हणले पाहिजे. ज्याला स्क्वेअर टर्नर म्हणतात अशी स्पिन घेणारी,चेंडू पडल्यावर धुळीचा स्फोट घडवणारी,सेन्सेक्स सारखी उसळी घेणारी अशी खेळपट्टी चेन्नईच्या ग्राऊंडस्मनने बनवल्यावर पहिल्या दिवशी चिकाटीने बॅटिंग करून मॅचचा निकाल लावून टाकायचा असतो.रोहित आणि रहाणेच्या भागीदारीने भारताची स्थिति मजबूत केली आहे हे इंग्लंडच्या ड्रेसिंग रूम मधल्या प्रशिकांच्या चिंतातुर नजरेतून दिसून आले.

भारताने अपेक्षेप्रमाणे नदीमच्या जागेवर अक्षर पटेल आणि सुंदर च्या जागेवर कुलदीपला घेतले.बुमराहला विश्रांती दिली.बॅटिंग मात्र तशीच्या तशी ठेवली. जो रूटने काही अप्रतिम फिल्ड पोजिशन लावून भारतीय बॅट्समनला वैचारिक गोंधळात पकडण्याचा प्रयत्न केला ज्यात तो सुरवातीला यशस्वी होताना दिसला. कोहलीची विकेट ऑफस्पिनरचा ड्रीम बॉल होता.
रोहित आणि रहाणे सकारात्मक खेळणे आपण समजू शकतो पण पुजाराने सुद्धा आज धावा काढायचा सपाटा लावला होता. रोहितने वरच्या क्लासची बॅटिंग केली ही द्विरुक्ती आहे.रोहित म्हणजेच वरचा क्लास,नयनरम्य शैली. उजवा पाय सुद्धा दुमडून डिफेन्स करताना त्याने स्पीनर्स विरुद्ध वेगळाच निग्रह दाखवला. प्रतिभावान कलाकारांना सतत गोष्टी घडवून आणायच्या असतात. त्यामुळे काही चेंडू बिनधावांचे गेल्यावर त्याचे बेचैन होणे स्वाभाविक होते.तरी त्याने स्वतः वर बराच ताबा ठेवला असे म्हणले पाहिजे. स्वीपचा एव्हढा वापर भारतीय बॅट्समन कडून पहिल्यांदाच दिसला.T20 मुळे कुठल्याच बॅट्समनसाठी कुठलाच शॉट आता अस्पृश्य राहिलेला नाही.
रहाणेच्या फुटवर्क मधिल सकारात्मक बदल पाहून समाधान वाटले.फास्ट बॉलर्सला चेंडू पर्यंत पोहचलेला पाय आणि बॅटचा बॉलशी कॉन्टॅक्ट होणारी वेळ अचूक आणि सुखावणारी होती.

रिव्हर्स स्विंग खूप उशिरा झालेला पाहून आश्चर्य वाटले. जो रूट सुद्धा चेंडू इतका वळवत होता आणि चेंडू इतके उडत होते ते पाहून इंग्लिश बॅट्समननी उद्या खिशात राजीनामा ठेवला नाही तर आश्चर्य वाटेल. ह्या खेळपट्टीवर 300 धावा धावफलकावर म्हणजे खरेतर 450 धरायला हव्यात.
रूट आणि स्टोक्स यांना पहिल्या डावात लवकर काढले तर चौथ्या दिवशी निकाल भारताच्या बाजूने लागेल.