IND Vs ENG Dharamsala Test : पहिल्या चार टेस्ट सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करून इंग्लंडविरुद्धची मालिका खिशात घातली. सध्या टीम इंडियाकडे 3-1 ची विजयी आघाडी आहे. त्यामुळे आता शेवटच्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) टीम इंडिया बदल करणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आगामी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.
KL Rahul का खेळणार नाही?
गेल्या वर्षी केएल राहुलच्या उजव्या क्वाड्रिसेप्सची शस्त्रक्रिया झाली होती. आता यात वेदना होत असल्याची तक्रार केएल राहुलने केली होती. त्यानंतर आता त्याचा त्रास आणखी वाढणार असल्याचं समजतंय. चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी केएल राहुल 90 टक्के फिट असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता केएल राहुलने लंडनची वाट धरली आहे. येत्या आठवड्यात त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे आता आगामी पाचव्या टेस्ट सामन्यात केएल राहुल खेळणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. बीसीसीआय यावर लवकर अपडेट देण्याची शक्यता आहे.
केएल राहुलने भारतासाठी 50 कसोटी सामन्यांमध्ये 2863 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 86 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात त्याने 22 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर देखील टीम इंडियाला विजय मिळवता आला नव्हता.
बुमराहचं काय होणार?
तिसऱ्या कसोटी सामन्यातील दमदार प्रदर्शनानंतर जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. तो पाचव्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहिल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं होतं. अशातच आता बुमराह आगामी सामना खेळणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर बुमराहला दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील आराम देण्यात आला होता. त्यामुळे मॅनेटमेंट्सच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला जात आहे.
रजत पाटीदारला पुन्हा संधी मिळणार?
विराट कोहलीच्या जागेवर रजत पाटीदारला संधी मिळाली होती. त्यानंतर तो केएल राहुलच्या अनुपस्थितीमुळे संघात कायम राहिला. रोहित शर्माने त्याला पुन्हा पुन्हा संधी दिली मात्र रजत पाटीदारला संधीचं सोनं करता आलं नाही. अशातच आता अखेर सामन्यात त्याला पुन्हा संधी मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. जर रजतला बाकावर बसवलं तर त्याच्या जागी देवदत्त पेडिक्कलला संधी मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.