मुंबई: भारत विरुद्ध इंग्लड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामने बाकी आहेत. त्यापैकी तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरीकडे भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 5 सामन्यांच्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 सीरिजमध्ये यावेळी बॉलिंगसाठी नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
KKRकडून 2020 च्या IPLसामन्यामध्ये या खेळाडूनं आपल्या गोलंदाजीनं अनेकांच्या दांड्या गुल केल्या होत्या. या खेळाडूचं वैशिष्ट्यं सांगायचं झालं तर त्याला एक किंवा दोन नाही तर तब्बल सात वेगवेगळ्या पद्धतीनं गोलंदाजी या खेळाडूला करता येते. आयपीएलमध्ये त्यानं केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला आता टी-20 सीरिजसाठी संधी मिळाली आहे.
आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी करणारा रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यालाही गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी -२० मालिकेत टीम इंडियाचा समावेश करण्यात आला होता पण दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. वरुण चक्रवर्तीला आता भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिजसाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. ही संधी त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
यावर्षी टी -20 वर्ल्ड कप खेळला जाणार असून वरुणने आयपीएलमध्ये स्वत: ला सिद्ध केले आहे. आता फक्त इंग्लंडविरुद्धच्या या संधीचे सोनं करण्यासाठी वरूणही सज्ज झाला आहे.
वरुण सात प्रकारे गोलंदाजी करू शकतो
रहस्यमय फिरकीपटू वरुणने दावा केला आहे की तो 7 वेगवेगळ्या पद्धतीनं गोलंदाजी करू शकतो. त्यामध्ये ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पीन, बोटांवर यॉर्करचा समावेश आहे. 2019 मध्ये वरुणला पंजाबच्या संघानं 8.4 कोटीमध्ये खरेदी केलं होतं.
इंग्लंडविरूद्ध टी -20 मालिकेसाठी 14 महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमार देखील भारतीय संघाकडून खेळणार आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव, यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि फलंदाज मनीष पांडे यांना संघातून वगळण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा अजूनही दुखापतीतून सावरलेले नाहीत. ही मालिका 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान खेळली जाईल. सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत.
भारतीय संघात कोणकोण असेल?
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार , दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.