IND vs NZ : ईशांत शर्मा बनवणार विक्रम, झहीर खान निशाण्यावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Feb 27, 2020, 06:03 PM IST
IND vs NZ : ईशांत शर्मा बनवणार विक्रम, झहीर खान निशाण्यावर

क्राईस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताचा फास्ट बॉलर ईशांत शर्माला नवा विक्रम करण्याची संधी आहे. ईशांत शर्माने आतापर्यंत ९७ टेस्ट मॅचमध्ये २९७ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच ३०० विकेट पूर्ण करायला ईशांतला फक्त ३ विकेटची गरज आहे.

ईशांत शर्मा ३०० विकेट पूर्ण करणारा तिसरा भारतीय फास्ट बॉलर बनेल. ईशांतच्याआधी कपिल देव आणि झहीर खान या फास्ट बॉलरनी ३०० विकेटचा टप्पा ओलांडला आहे. कपिल देव यांनी ४३४ विकेट तर झहीर खानने ३१२ विकेट घेतल्या आहेत. झहीर खानचा ३११ विकेटचा विक्रम मोडण्यासाठी ईशांतला कमीतकमी ८ महिन्यांचा वेळ लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टनंतर टीम इंडिया पुढची टेस्ट थेट ऑक्टोबर महिन्यात खेळणार आहे.

ईशांत शर्माने पहिल्या टेस्टमध्ये ५ विकेट घेतल्या होत्या, याचसोबत त्याआधी बांगलादेशविरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्ट मॅचमध्येही ईशांतला ५ विकेट मिळाल्या होत्या. लागोपाठ दोन्ही टेस्ट मॅचमध्ये ईशांतने प्रत्येकी ५ विकेट घेण्याचा करिश्मा केला होता.

भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने ६१९ विकेट घेतल्या आहेत. तर या यादीत ४३४ विकेटसह कपिल देव दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हरभजन सिंगने ४१७ विकेट, आर अश्विनने ३६५ विकेट आणि झहीरने ३११ विकेट घेतल्या आहेत.