क्राईस्टचर्च : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा ७ विकेटने विजय झाला. याचसोबत न्यूझीलंडने ही टेस्ट सीरिज २-०ने जिंकली. सप्टेंबर २०१८नंतर भारताचा पहिल्यांदाच लागोपाठ २ टेस्ट मॅचमध्ये पराभव झाला. या सीरिजमध्ये भारताच्या बॅट्समननी घोर निराशा केली. जगातला सर्वोत्तम बॅट्समन अशी ओळख असलेल्या विराटलाही न्यूझीलंड दौऱ्यात संघर्ष करावा लागला. विराट कोहलीने संपूर्ण सीरिजमध्ये फक्त ३८ रन केले.
खराब कामगिरी केल्यानंतरही विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला पिछाडीवर टाकलं आहे. स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये ७,२२७ रन केले आहेत. दुसरी टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरण्याच्या आधी विराटच्या नावावर ८५ टेस्ट मॅचमध्ये ७,२२३ रन होते. या मॅचच्या २ इनिंगमध्ये विराटने ३ रन आणि १४ रनची खेळी केली. याचसोबत विराटने स्मिथला मागे टाकलं आहे. विराटच्या नावावर ८६ टेस्टमध्ये ७,२४० रन झाले आहेत.
विराट कोहलीने क्राईस्टचर्च मॅचच्या आधी ५४ टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं. ही टेस्ट विराटची कर्णधार म्हणून ५५वी होती, याचसोबत विराटने इंग्लंडच्या माईक अथर्टनला मागे टाकलं आहे. अथर्टनने ५४ टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचं नेतृत्व केलं होतं. सर्वाधिक टेस्ट मॅचमध्ये नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट ११व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथने सर्वाधिक १०९ टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व केलं.