WTC 2021: न्यूझीलंड गदाधारी पैलवान,भारत परेशान

टीम इंडिया कुठे कमी पडली आणि किवीने त्याचा कसा फायदा घेतला वाचा सविस्तर

Updated: Jun 24, 2021, 11:16 AM IST
WTC 2021: न्यूझीलंड गदाधारी पैलवान,भारत परेशान title=

क्रिकेट समीक्षण रवि पत्की, झी मीडिया मुंबई: जागतिक कसोटी अजिंक्यपद न्यूझीलंड ने पटकावले. निकाल भारतासाठी निराशाजनक होता.पण नीट विचार केला तर आश्चर्यकारक नव्हता. 2007 नंतर भारताने इंग्लंडच्या कंडिशन्स मध्ये नांगी टाकली आहे. गेल्या 14, 15 वर्षात इंग्लंडमधल्या स्विंग आणि ड्युक बॉल विरुद्ध भारताने सरासरी प्रत्येक डावात 200 ते 250 धावा केल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियातल्या पेस आणि बाऊन्स वर विजय मिळवला आहे पण इंग्लंड मधल्या स्विगिंग कंडिशन्स आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सिमिंग कंडिशन्स वर विजय मिळवणे भारताला जमलेले नाही. ह्या परीक्षा घेणाऱ्या कंडिशन्स असतात. 

पुजाराचे अपयश: अंतिम सामन्यात भरवश्याच्या पुजाराला दुर्मीळ अपयश आले. पुजारा प्रत्येक इंनिंग ला भरपूर चेंडू खेळतो(107 to be precise).त्याची अभेद्य भिंत अंतिम सामन्यात लवकर ढासळली त्यामुळे दोन्ही बाजूने विकेट्स पडत गेल्या.

न्यूझीलंडची गोलनदाजी: वातावरणाचा पुरेपूर फायदा घेणारी न्यूझीलंड गोलनदाजी अचूक होती. तसेच दोन उच्च दर्जाच्या डावखुऱ्या बोलर्स मुळे बॉलिंगला मस्त वैविध्य होते.6 फूट 8 इंच उंची असलेल्या जेमिसनने उंची आहे म्हणून शॉट बॉलिंग न करता अचूक टप्प्यावर भर दिला आणि दोन्ही स्विंग लिलया केले.

 शक्ती असताना युक्ती प्रदर्शन केल्याने जेमिसनचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.भरवशाच्या साउदिने कप्तानाला निराश केले नाही. डी ग्रॅण्डहोम ने न्यूझीलंडचे जुने गोलनदाज गेविन लार्सन आणि टॉम लेथम चे वडिल रॉड लेथम जशी गोलनदाजी करत असत तशी करून एक एन्डला दबाव तयार करण्याचे काम उत्तम केले. न्यूझीलंडने स्लिप मध्ये झेल सोडले नाहीत.

भारताची गोलनदाजी: बुमराहने ऑस्ट्रेलियन लेंथ ची गोलनदाजी केली. इशांत ने सहाव्या स्टंप वर गोलनदाजी केली. ज्या टप्प्यावरून चेंडू इन-आऊट घ्यायला हवे होते तो सातत्याने फक्त शमीला सापडला.

संघ निवड: भारताने बॅटिंग मजबूत करण्याकरता आणि पिच तिसऱ्या आणि चौथ्या इंनिंग मध्ये स्पिनला मदत करेल म्हणून जडेजा आणि अश्विनला घेतले. मॅच चालू असताना जडेजाच्या जागेवर सिमिंग ऑलराउंडर हवा होता असे वाटले.

(हार्दिक पंड्या)तसेच आता इंग्लंड विरुद्ध येणाऱ्या 5 कसोटीच्या मालिकेत जास्त फुल लेंथ बॉलिंग साठी बुमराह च्या जागेवर शार्दूल आणि इशांतच्या जागेवर सिराजचा विचार व्हावा. (भुवनेश्वर लहान मुलांच्या खेळण्यासारखा आहे.त्याचे सारखे काहीतरी मोडलेले असते.इंग्लंडचा जुना बॉलर क्रिस ओल्ड नंतर इतक्या दुखापती होणारा दुसरा खेळाडू आठवत नाही)

भारत खूप काष्टानी अंतिम सामन्या पर्यंत आला होता.त्यामुळे हार झाल्याने दुःख झाले.पण वाळवंटात उंट आणि बर्फ़ाळ भागात  पांढरी अस्वले टिकतात तसे न्यूझीलंडचा संघ अनुभवी परिस्थितीत जुळवून घेऊन जिंकला. कॅप्टन म्हणून कोहली योग्य की अयोग्य ही चर्चा इंग्लंडची मालिका सुरू होण्यापूर्वी नको.पण जेव्हा होईल तेव्हा माझे मत रोहितला असेल.

वेल प्लेड न्यूझीलंड. तुम्ही या सामन्यात नक्कीच जास्त चांगला संघ होतात.