T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना भारताने जिंकला असला तरी शेवटचं षटक प्रत्येकाचं लक्षात राहणारं आहे. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांवर दबाव होता. प्रत्येक चेंडूवर थरार रंगला होता. मोहम्मद नवाजनं टाकलेल्या शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूची एक गोष्ट तयार झाली आहे. भारताला शेवटच्या चेंडूवर 2 धावा आवश्यक होत्या आणि स्ट्राईकला आर. अश्विन होता. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतलं संपूर्ण कसब पणाला लावून एक चेंडू वाइड केला. त्यामुळे सामना एक चेंडू एक धाव असा आला आणि सामना भारताने जिंकला. पण जो चेंडू वाइड म्हणून सोडला, तो पॅडला लागला असता तर काय केलं असतं? याबाबत आर. अश्विननं स्पष्टच सांगितलं.
"नवाजनं टाकलेला माझ्या पॅडवर लागला असता तर मी फक्त एकच गोष्ट केली असती. मी ड्रेसिंग रूममध्ये आलो असतो आणि ट्विटरवर स्पष्टच लिहिलं असतं, 'खूप खूप धन्यवाद, माझी क्रिकेट कारकीर्द आणि प्रवास खूप छान होता आणि तुम्हा सर्वांचे आभार", आर. अश्विनने बीसीसीआय टीव्हीवर हृषिकेश कानिटकर यांच्याशी संवाद साधताना ही बाब उघड केली.
A golden rewind - When two heroes of two engrossing finishes get together to dissect their famous victories
Here's @hrishikanitkar & @ashwinravi99 talking about the two #INDvPAK games - by @RajalArora
Click https://t.co/fDy4r9U2cH to watch the full interview
— BCCI (@BCCI) October 26, 2022
मेलबर्नचं मैदान 90 हजार प्रेक्षकांनी भरलं होतं. सहाजिकच दबाव काय असेल? सांगायला नको. पण आर. अश्विनची समयसूचकता पाहून क्रिकेट विश्वातून कौतुक होत आहे. नॉन स्ट्राईकला असलेल्या विराट कोहलीने देखील आर. अश्विनला शाबासकी दिली. “मी अश्विनला कव्हर्सवर चेंडू मारायला सांगितला. पण अश्विनने त्याच्या डोकं लावलं. असं करणं खरंच एक धाडसी गोष्ट होती. चेंडू रेषेच्या आत आला आणि त्याने त्याचे रुपांतर वाईडमध्ये केले,", असं विराट कोहलीने सांगितलं.