टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत पंचगिरी करणारा मराठी अंपायर मूळचा रत्नागिरीचा, पाहा कोण आहे तो?

टीम इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका (Team India vs South Africa 2nd Test) यांच्यात जोहान्सबर्गमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या अल्लाउद्दीन पालेकरने (Allahudien Paleker) अंपायरिंगमध्ये पदार्पण केलं.   

Updated: Jan 6, 2022, 04:04 PM IST
टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत पंचगिरी करणारा मराठी अंपायर मूळचा रत्नागिरीचा, पाहा कोण आहे तो? title=

जोहान्सबर्ग : टीम इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका (Team India vs South Africa 2nd Test) यांच्यात जोहान्सबर्गमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या अल्लाउद्दीन पालेकरने (Allahudien Paleker) अंपायरिंगमध्ये पदार्पण केलं. पालेकर, म्हणजे मराठी आडनाव? हो बरोबर ओळखलंत. या दक्षिण आफ्रिकेच्या पंचाचं महाराष्ट्राशी जवळच नातं आहे. महाराष्ट्राशी कनेक्शन असलेला हा अंपायर आफ्रिकेकडून कसं पदार्पण केलं, तो महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील आहे, हे आपण जाणून घेऊयात. (ind vs sa 2nd test match allahudien paleker makes his test debut in umpiring know his maharashtra ratnagiri connection)

अल्लाउद्दीन पालेकर हे मुळचे कोकणातील रत्नागिरीचे. पालेकर कुटुंबिय हे मुळचे रत्नागिरीतील खेडमधील शीव गावाचे रहिवाशी आहेत. अल्लाउद्दीनचे वडिल नोकरीनिमित्ताने काही वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेत स्थलांतरित झाले. त्यानंतर अल्लाउद्दीनचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेत झाला.  

"मी सुद्धा पालेकर आहे. अल्लाउद्दीन हे आमच्या गावातील आहेत. अल्लाउद्दीनचे वडिल नोकरीसाठी काही वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेला गेले आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीन आफ्रिकेतच जन्मला. मात्र त्याचं मूळ गाव शीव आहे", अशी माहिती शीव गावचे सरपंच  दुर्वेश पालकर यांनी दिली. ते पीटीआयसह बोलत होते.    

रणजी ट्रॉफीतही पंचगिरी

अल्लाउद्दीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून पदार्पण करण्याआधी त्याने विविध स्थानिक स्पर्धांमध्ये अंपायरिंग केली आहे. अल्लाउद्दीनने 2014-15 च्या मोसमात रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात अंपायरिंग केली होती. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.   

अल्लाउद्दीनने भारतीय पंच कृष्णमाचारी श्रीनिवासनसह मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील साखळी फेरीत अंपायरिंग केली होती.

अंपायर होण्यासाठी कठोर परिश्रम

अल्लाउद्दीन 44 वर्षांचा आहे. अल्लाउद्दीन आफ्रिकेचा 57 वा तर एकूण 497 वा कसोटी अंपायर आहे. टेस्ट अंपायर होण्यासाठी अल्लाउद्दीनने कठोर मेहनत घेतली. अल्लाउद्दीनने अंपायर होण्यासाठी जवळपास 15 वर्ष मेहनत घेतली.  

अंपायर होण्याआधी क्रिकेटर

अल्लाउद्दीन अंपायर होण्याआधी क्रिकेटर होता. श्रीलंकेच्या कुमार धर्मसेनासारखा. मात्र अल्लाउद्दीन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आहे.

अल्लाउद्दीनने वेस्टर्न प्रॉविन्स आणि टायटन्स सारख्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या टीमकडून फॅफ डु प्लेसीस, एबी डी व्हीलियर्स आणि डेल स्टेनसारखे खेळाडू या टीमकडून खेळले आहेत. 

अल्लाउद्दीनचं 2006 मध्ये कॉन्ट्रेक्ट रिन्यू केलं गेलं नाही. त्यामुळे अल्लाउद्दीनने अंपायरिंगकडे मोर्चा वळवला.   

अल्लाउद्दीनची अंपायरिंगची कारकिर्द

अल्लाउद्दीनने आतापर्यंत 79 फर्स्ट क्लास सामन्यात अंपायरिंग केली आहे. अल्लाउद्दीनने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय डेब्यू केलं. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 3 वनडे आणि 29 टी 20 सामन्यात अंपायरिंगची भूमिका चोखपणे पार पाडली आहे.    

अंपायरिंग कनेक्शन

योग्य आणि निक्षपक्ष पंचगिरी ही अल्लाउद्दीनच्या रक्तातच होती. अल्लाउद्दीनला पंचगिरीची बाळकडू हे घरातूनच मिळालं. अल्लाउद्दीनचे वडिल जमालुद्दीन हे देखील अंपायर आहेत.  

जमालुद्दीन हे केप टाऊनमधील विनबर्ग हायस्कूलमध्ये अंपायरिंगची जबाबदारी पार पाडतात. तसेच अल्लाउद्दीनचे काका पंच आहेत. तसेच अल्लाउद्दीनचे 2 चुलत भाऊ हे अंपायर होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेत आहेत.