IND vs SA Final Rules: फायनलमध्ये पाऊस आला तर कसे असतील ICC नियम? पाहा कोणत्या टीमला होणार फायदा

India vs South Africa T20 World Cup Final ICC Rules: टी-20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी रिझर्व डेची घोषणा करण्यात आली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 29, 2024, 08:17 AM IST
IND vs SA Final Rules: फायनलमध्ये पाऊस आला तर कसे असतील ICC नियम? पाहा कोणत्या टीमला होणार फायदा title=

India vs South Africa T20 World Cup Final ICC Rules: टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना आज खेळवला जाणार आहे. टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना रंगणार असून विजेती टीम टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलच्या सामन्यात ज्याप्रमाणे पावसाने व्यत्यय आणला होता तसा फायनलमध्येही पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फायनल सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र संपूर्ण सामना रद्द होण्याइतका पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. यावेळी पावसाची संभाव्यता काय आहे आणि पाऊस पडल्यास नियम काय असतील हे देखील जाणून घेऊया.

टी-20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी रिझर्व डेची घोषणा करण्यात आली आहे. याआधी खेळल्या गेलेल्या सेमीफायनल 1 साठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. मात्र भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी रिझर्व्ह डेची तरतूद नव्हती. यावेळी या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला होता. 

T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनल सामन्यासाठी आयसीसीने रिझर्व्ह डे ठेवला आहे. याची घोषणा यापूर्वीच जाहीर केलं होतं. परंतु पहिल्या दिवशी सामना खेळला जाणार नसेल तरच हा रिझर्व्ह डे वापरण्यात येणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, पहिल्या दिवशी किमान 10 ओव्हर्सचा सामना व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. कोणताही T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल तर किमान 5 ओव्हर्सचा सामना असणं आवश्यक आहे, त्यानंतरच निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु यापेक्षा कमी ओव्हर्स खेळवल्या गेल्या तर सामन्यांचा निकाल जाहीर केला जात नाही. 

यंदाच्या टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनल आणि अंतिम फेरीत किमान 10 ओव्हर्सचे सामने होणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी दहा ओव्हर्सचा सामना देखील खेळला गेला नाही, तर तो सामना फक्त रिझर्व्ह डे म्हणजेच राखीव दिवशी खेळला जाणार आहे. याशिवाय पहिल्या दिवशी सामना सुरू झाला आणि त्यानंतर सामना खेळता आला नाही आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत गेला, तर पहिल्या दिवशी जिथे थांबला होता तिथूनच सामना सुरू करण्यात येणार आहे. यावेळी फायनलसाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला असून सामना तीन तास दहा मिनिटं अधिक चालू शकतो.

बार्बाडोसमध्ये कसं असेल हवामान

AccuWeather नुसार, शनिवारी सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बार्बाडोसच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 4 ते सकाळी 9 दरम्यान पावसाची 50 टक्के शक्यता आहे. त्यामुळे आता सामना सुरु झाल्यावर पाऊस व्यत्यय आणणार का हा प्रश्न चाहत्यांसमोर आहे.