ODI मधील सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या संतापला, WI ला म्हणाला 'तुम्हाला साधं...'

Ind vs WI: तिसऱ्या एकदवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) दारुण पराभव केला आहे. भारताने 200 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव करत सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान, या विजयानंतरही हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र नाराज होता. त्याने वेस्ट इंडिज बोर्डाला (West Indies Cricket Board) खडे बोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 2, 2023, 10:50 AM IST
ODI मधील सर्वात मोठा विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या संतापला, WI ला म्हणाला 'तुम्हाला साधं...' title=

Ind vs WI: वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात केलेल्या पराभवाचा वचपा काढत भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या विजयाची नोंद केली. यासह भारताने 2-1 ने मालिका जिंकली आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) दारुण पराभव केला. भारताने तब्बल 200 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव करत आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र नाराज होता. हार्दिक पांड्याने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली असून, वेस्ट इंडिज बोर्डाला (West Indies Cricket Board) खडे बोल सुनावले आहेत. 

सामना जिंकल्यानंतर संवाद साधताना हार्दिक पांड्याने भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर नाराजी जाहीर केली आहे. हार्दिकने म्हटलं आहे की, "संघाला कोणत्याही चैनीच्या गोष्टी नको असून, पुढील वेळी जेव्हा आम्ही दौरा करु तेव्हा मुलभूत गोष्टींची काळजी घेतली जाईल अशी आशा आहे". 

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या मोठ्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने होणार आहेत. यामधील कसोटी आणि एकदिवसीय मालिका पार पडली असून, आता फक्त टी-20 मालिका शिल्लक आहे. मात्र यावेळी वेस्ट इंडिज बोर्डाकडून व्यवस्थित सुविधा दिल्या जात नसल्याने हार्दिकने जाहीरपणे नाराजी जाहीर केली आहे. 

WI vs IND: तिसऱ्या वनडे सामन्यात भारताकडून विंडीजचा धुव्वा; सामन्यासह सिरीजवरही कब्जा

 

सामना संपल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "आम्ही खेळलेल्या मैदानांमधील हे एक चांगलं मैदान आहे. आम्ही पुढील वेळी वेस्ट इंडिजला येऊ, तेव्हा गोष्टी चांगल्या असतील अशी आशा आहे. खासकरुन प्रवासाची सुविधा नीट हवी. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड याची दखल घेईल आणि त्यात सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे. आम्ही कोणत्याही चैनेच्या गोष्टी मागत नसून, काही मुलभूत गोष्टींची काळजी घ्यायला हवी".

भारताचा सर्वात मोठा विजय

वेस्ट इंडिजने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत 352 धावा केल्या. इशान किशन आणि शुभमन गिल यांनी 143 धावांची भागीदारी करत संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. यानंतर संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांनी तुफान फटकेबाजी केल्याने भारताने 5 गडी गमावत 351 धावा ठोकल्या. 

भारताकडून शुभमनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 85 चेंडूत 92 धावा केल्या. तर इशान किशनने 77 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने 52 चेंडूत 70 धावा ठोकल्या. तर संजू सॅमसनने 41 चेंडूत 51 धावा केल्या. चौघांनी केलेल्या या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने वेस्ट इंडिजला तब्बल 352 धावांचं आव्हान दिलं. 

दरम्यान वेस्ट इंडिजची सुरुवातच अडखळत झाली. मुकेश कुमारने पहिल्या ओव्हरमध्ये ब्रॅण्डन किंगला बाद केलं. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 151 धावांवर बाद झाला आणि भारताने 200 धावांनी हा सामना जिंकला. 36 व्या ओव्हरलाच भारताने सामना आपल्या खिशात घातला.