मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता हा सामना नियोजित वेळेनंतर दोन तासांनी सुरू होणार आहे, अशी माहिती वेस्ट इंडिज बोर्डाकडून देण्यात आली आहे. (india vs west indies 2nd t20 match delayed)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना रात्री 10 वाजता सुरू होईल. भारत आणि वेस्ट इंडिज (IND Vs WI) यांच्यातील दुसऱ्या T20 सामना उशिरा सुरु होत आहे. याआधी हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार होता. खेळाडूंचे सामान अद्याप मैदानावर पोहोचले नसल्याने वेळ पुढे ढकलावी लागली आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे की, अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, जी बोर्डाच्या हाताबाहेर गेली. काही कारणांमुळे खेळाडूंचे सामान त्रिनिदाद ते सेंट किट्सपर्यंत वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
वेस्ट इंडीज बोर्डाने सांगितले की, आता हा सामना रात्री 10 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल, तर स्थानिक वेळ दुपारी 12.30 वाजता असेल. हा सामना सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये खेळला जात आहे.
याआधी सोमवारी सकाळी भारत-वेस्ट इंडिज संघाला अद्याप अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नसल्याची बातमी आली होती. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत, ज्यासाठी टीम इंडिया तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर रवाना होणार आहे. मात्र अद्यापपर्यंत दोन्ही संघांच्या खेळाडूंना व्हिसा मिळालेला नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताने पहिला सामना जिंकला आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका आधीच जिंकली आहे.