तिसऱ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर; आफ्रिकेचा व्हाईटवॉश होणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

Updated: Oct 21, 2019, 06:02 PM IST
तिसऱ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर; आफ्रिकेचा व्हाईटवॉश होणार

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची अवस्था १३२/८ अशी झाली होती. दक्षिण आफ्रिका अजूनही २०३ रननी पिछाडीवर आहे. दिवसाअखेरीस थिऊनिस डे ब्रुन ३० रनवर नाबाद आणि एनरिच नोर्टजे ५ रनवर नाबाद खेळत होता. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर उमेश यादवला २ विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विनला प्रत्येकी १-१ विकेट घेता आली.

फास्ट बॉलर उमेश यादवने टाकलेला बॉल डीन एल्गारच्या डोक्याला लागला. यानंतर एल्गार मैदानातच पडला. दुखापतग्रस्त एल्गार पॅव्हेलियनमध्ये परत गेल्यानंतर बॅटिंगला आलाच नाही. उद्या जर एल्गार बॅटिंगला आला नाही तर उरलेली १ विकेट घेऊन भारत विजयाची दिवाळी साजरी करेल.

त्याआधी तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या इनिंगमध्ये १६२ रनवर ऑल आऊट झाली, त्यामुळे भारताने त्यांना फॉलो-ऑन दिला. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये ४९७ रन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग फक्त १६२ रनवर संपुष्टात आली. यामुळे टीम इंडियाला ३३५ रनची आघाडी मिळाली.

पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेकडून झुब्यार हमझाने सर्वाधिक ६२ रनची खेळी केली.

३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने आधीच २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. विशाखापट्टणम आणि पुण्यात झालेल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला आहे. रांचीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्येही विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश करण्याची नामी संधी विराट कोहलीच्या टीमला चालून आली आहे.