Paris Olympics 2024 : भारताने जिंकलं चौथं कांस्य पदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभव

India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला (Bronze medal) गवसणी घातली. भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. कॅप्टन हरमनप्रीतने 2 महत्त्वाचे गोल केले.

सौरभ तळेकर | Updated: Aug 8, 2024, 07:35 PM IST
Paris Olympics 2024 : भारताने जिंकलं चौथं कांस्य पदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभव title=
India vs Spain Hockey Bronze Medal

India vs Spain Hockey Bronze Medal Match : कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. सेमीफायनल सामन्यात जर्मनीने भारताचा 3-2 ने पराभव केल्यानंतर भारताला कांस्य पदकासाठी सामना खेळावा लागला होता. अशातच भारताने कांस्य पदक जिंकून भारतीयांची मान गर्वांने उंचवली आहे. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने सामन्यात 2 गोल केले. भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. हॉकी संघाच्या 'द वॉल' म्हटला जाणाऱ्या श्रीजेश याचा अखेरचा सामना होता आणि श्रीजेशने सामन्यात तशीच कामगिरी करून दाखवली. मागील ऑलिम्पिकमध्ये देखील भारताने कांस्य पदक जिंकलं होतं. आता भारताने कांस्य पदक डिफेन्ड केलं आहे.

सामन्यात नेमकं काय झालं?

भारताच्या गुरजंत सिंगच्या डोक्याला चेंडू लागून जखमी झाला. त्यामुळे भारताला पहिल्यांदाच मोठा धक्का बसला. गुरजंतला मैदान सोडावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने पुन्हा अटॅक सुरू केला अन् पेनल्टी स्ट्रोकवर पहिला गोल केला.  स्पेनसाठी मार्क मिरालेसने पेनल्टी स्ट्रोक घेतला होता. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरच्या 14 सेकंदात भारताचा कॅप्टन हरमनप्रित कौरने गोल केला अन् सामना बरोबरीत आणला. 

तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्याचा फायदा कर्णधार हरमनप्रीत सिंगने घेण्यात कोणतीही चूक केली नाही. भारतासाठी या सामन्यातील दुसरा गोल हरमनप्रीत सिंगने 33 व्या मिनिटाला केला. त्यानंतर भारताने आघाडी घेतली. अखेरच्या काही मिनिटात स्पेनने आक्रमक खेळ दाखवला. पण तीन पेनल्टी कॉर्नर मिळून देखील स्पेनला गोल करता आला नाही.

भारतीय हॉकी संघाच्या 'द वॉल'ची निवृत्ती

आता मी शेवटच्या वेळी पोस्ट्सच्या मध्ये उभा राहिलो आहे. माझे हृदय कृतज्ञता आणि अभिमानाने भरून गेलंय. स्वप्नात हरवलेल्या एका तरुण मुलापासून भारताच्या सन्मानाचे रक्षण करणाऱ्या माणसापर्यंतचा त्यांचा विलक्षण प्रवास काही कमी नव्हता, असं श्रीजेशने म्हटलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल भारतीयांचे आभार. हा शेवट नाही, ही तर आठवणींची सुरुवात आहे, असं गोलरक्षक पीआर श्रीजेश याने म्हटलं आहे.